Pune Crime : नाकाबंदीमध्ये आढळले १३८ कोटींचे सोने १२८ किलो सोने वजन : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची कारवाई
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. पैशांचे आणि विविध वस्तूंचे होणारे वाटप, बेकायदा वाहतूक तसेच समाजविघातक कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. सातारा रस्त्यावर पद्मावतीजवळ पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान तब्बल १२८ किलो पोलिसांनी जप्त केले. संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनात हे सोने आढळून आले. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत हे सोने दागिन्यांच्या स्वरूपात असून मुंबईहून पुण्याला आणण्यात आले होते. शहरातील सराफा व्यावसायिकांचे हे सोने असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा रस्त्यावर पद्मावतीजवळ पोलिसांनी नाकाबंदी पॉईंट केलेला आहे. याठिकाणी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जाते. शुक्रवारी सकाळी याठिकाणी नाकाबंदीमध्ये वाहनांची तपासणी सुरू होती. पोलिसांकडून वाहने तपासली जात असताना कार्गो वाहन थांबविण्यात आले. या वाहनामध्ये काही बॉक्स ठेवलेले होते. या बॉक्सबाबत शंका आल्याने त्याची तपासणी करण्यात आली. वाहनासोबत असलेल्या कर्मचारी व चालकांनी त्यामध्ये सोने असल्याची माहिती पोलिसांना दिली. नाकाबंदीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी हे वाहन व सोने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, या प्रकाराची माहिती माहिती निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आली.
परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी देखील पोलीस ठाण्यात धाव घेतली. वाहनासोबत असलेल्या चालक व कामगारांकडे चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासात हे सोने शहरातील काही सराफी व्यावसायिकांचे असल्याचे समोर आले आहे. हे सर्व सोने प्राप्तीकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले. प्राप्तीकर विभागाकडून त्याची पडताळणी सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचे सोने कोठून आणले, तसेच ते कोणाला देण्यात येणार होते, यादृष्टीने तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेले कार्गो वाहन एका ट्रान्सपोर्ट कंपनीचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबत उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, की शुक्रवारी सकाळी नाकाबंदीमध्ये वाहनांची तपासणी केली जात असताना हे सोने आढळून आले. याविषयी सविस्तर चौकशी करून निवडणूक आयोग आणि प्राप्तीकर विभागाला माहिती देण्यात आली. हे सोने प्राप्तीकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून चौकशी सुरू असून हे सोने नेमके कोणाचे आहे याबाबत अद्याप सांगता येणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
याविषयी बोलताना पीएनजी अँड सन्सचे संचालक आणि कमोडिटी तज्ज्ञ अमित मोडक म्हणाले, की पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडलेले सोने हे पुण्यातील विविध सराफी व्यावसायिकांचे आहे. ही शहरातील अनेक व्यावसायिकांनी दिलेली ऑर्डर होती. सोन्याच्या दागिन्यांची वाहतूक करणारी ही गाडी ‘सिक्वेल लॉजिस्टीक सर्व्हिसेस’ या कंपनीची आहे. ही गाडी दैनंदिन स्वरूपात येत असते. सोन्याच्या दागिन्यांची वाहतूक टेम्पोमधून नव्हे तर या सुरक्षित वाहनामधून केली जात होती. हे सर्व दागिने सीलबंद असतात. त्याचे ईमेलद्वारे बिल झालेले असून त्यावर जीएसटीचे पंचिंग देखील झालेले आहे. हा कोणताही अनधिकृत व्यवहार नाही. यामध्ये जसे पीएनजी अँड सन्सचे दागिने आहेत तसेच अन्य व्यावसायिकांचे देखील दागिने आहेत. त्यामुळे याचा निवडणुकीशी संबंध जोडून व्यावसायिकांबाबत चुकीचा संदेश समाजात जाऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.