संग्रहित छायाचित्र
पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी तीन हजार मोबाइल क्रमांकाची माहिती पोलिसांकडून संकलित जात असून त्याची तपासणी केली जात आहे. या तपासणीच्या आधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. यासोबतच दोनशेहून जास्त सराईतांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मित्रासह बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळ घटना गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर जखमी असलेल्या मुलीला तिच्या मित्राने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने पोलिसांना याबाबतची माहिती कळविण्यात आल्यानंतर पुण्यात खळबळ उडाली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या मागावर आहेत. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.
बोपदेव घाटातील टेबल पॉइंट परिसरात गुरुवारी रात्री तरुणी आणि तिचा मित्र फिरायला गेले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखविला. मित्राला मारहाण करुन त्याचा शर्ट काढला. शर्टने हातपाय बांधले. पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय बांधले. तरुणाला एका झाडाला बांधून आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींकडे कोयता, चाकू अशी शस्त्रे होती, तसेच एका आरोपीच्या हातात बांबू होता. मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.
पोलीस ठाण्याला साधारणपणे शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या संदर्भात रूग्णालयाकडून माहिती कळविण्यात आली. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या आणि पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला सूचना करण्यात आल्या असून त्यांची पथके देखील आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहेत. बोपदेव घाट हा परिसर निर्जन आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच तांत्रिक अडचणींमुळे मोबाइल विश्लेषण करण्यात येत अडथळे आले आहेत. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरापर्यंत शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे.