संग्रहित छायाचित्र
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर असलेल्या नवले पूल परिसरात मागील काही महिन्यांपासून काही महिला रस्त्यावर उभ्या राहून बेकायदा वेश्या व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी अनेकदा याविषयी कारवाईची मागणी केली होती. मात्र, पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर याठिकाणी पोलिसांनी देहविक्रय करणाऱ्या आठ महिलांवर कारवाई करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. (Pune Crime News)
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या महिला रस्त्यावर उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करून खुणावत असल्याच्या आणि त्यामुळे या भागातील महिलांना व मुलींना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या भागातील रहिवाशांनी सिंहगड रस्ता पोलिसांकडे वेळोवेळी कारवाईची मागणी केली होती. मात्र, पोलिसांकडून कारवाई केली जात नव्हती. नवले पूलाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर या महिल्या उभ्या राहात होत्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या आठ महिलांना ताब्यात घेऊन अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.