संग्रहित छायाचित्र
राज्यातील कारागृहात कैदी एकमेकांना विशेष नावाने बोलावतात. ही नावे कधी कधी मजेशीर असतात तर कधी या नावांना काही संदर्भही असतो. मचांडी, काळाटोपी, लालपट्टी, टॅक्सी, वकील अशा विशेष टोपणनावाने कैदी उल्लेख करत असतात.
कारागृहातील शिपाई, हवालदार, सुभेदार यांच्यासाठी बंदिवानांकडून ‘बाबा’ असे संबोधन आदराने वापरले जाते. राज्य कारागृहाने नुकतेच ‘कॉफी’ टेबल बुक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात कारागृहातील विशेष टोपणनावांची यादी प्रथमच प्रसिद्ध केली आहे.
राज्यातील सर्वच कारागृहांत विविध उपक्रमांव्दारे आमूलाग्र बदल करण्याचे श्रेय अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांना जाते. त्यांनी नुकतेच कारागृहात केलेल्या विविध प्रकल्पांच्या माहितीचे ‘कॉफी टेबल बुक’ प्रकाशित केले आहे. या पुस्तकात प्रथमच कारागृहात बंदिवानांकडून व कर्मचाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या विशेष टोपणनावांचा उल्लेख प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे कारागृहातील गेली पन्नास साठ वर्षांपासून वापरण्यात येणाऱ्या टोपणनावांचा परिचय सर्वसामान्यांना होणार आहे.
न्यायाधीन व दोष सिद्ध झालेल्या कैद्यांना तुरुंगामध्ये बंदोबंस्तात ठेवले जाते. संबंधितांसाठी बंदी किंवा बंदिवान असा शब्द वापरण्यात येतो. ‘बाबा’ कारागृहातील शिपाई, हवालदार, सुभेदार यांच्यासाठी बंदिवानांकडून ‘बाबा’ असे संबोधन आदराने वापरले जाते. ‘मचांडी’ हा शब्द एखादा बंदी सतत भांडण करणारा, कांगावा करणारा किंवा प्रशासना विरोधी कृती करणारा असतो तेव्हा शब्द वापरला जातो. न्यायाधीन बंद्यांसाठी ‘हवलादी’ हा शब्द वापरण्यात येतो. कारागृहामध्ये बेकायदेशीररीत्या जेवण गरम करणे, गुपचूप जेवण तयार करणाऱ्याला ‘हंडी’ या नावाने ओळखले जाते.
कारागृहात सतत येणाऱ्या आणि गैरवर्तन करणाऱ्या सराईत बंद्याला ‘काळाटोपी’ म्हणतात. कायदेशीर रखवालीतून पलायन केलेल्या आणि गुन्हा दाखल झालेल्या बंदिवानाला ‘लालपट्टी’ बंदी म्हणतात. कारागृहात प्रतिबंधित वस्तू बेकायदेशीररीत्या घेऊन येणाऱ्याला व्यक्तीला ‘टॅक्सी’ असे संबोधले जाते. शरीरामध्ये अवैधरीत्या प्रतिबंधित वस्तू लपवून आणणाऱ्याला ‘गोडाऊन’ म्हटले जाते. शिक्षाधीन वॉर्डर, वॉचमनच्या गणवेशाचा भाग पट्टा टोपी असते. संबंधित वॉर्डरला प्रशासनाकडून पट्टा व टोपी देण्यात येते. त्यासोबत वॉचमनला टोपी दिली जात असल्यामुळे कारागृहात ‘पट्टाटोपी’ शब्द प्रचलित आहे. कारागृहातील इतर बंद्यांना सल्ला देणाऱ्या आरोपीला ‘वकील’ असे म्हणतात. कारागृहात एकाच गुन्ह्यातील सहआरोपीस ‘नंबरकारी’ असे म्हटले जाते.