संग्रहित छायाचित्र
बनावट कागदपत्रांच्या आधारे स्पीनी कंपनीची ९६ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३ जून ते २ ऑगस्ट या कालावधीत भुजबळ चौक, वाकड येथे घडला.
याप्रकरणी विपिनकुमार सुरेशचंद यादव (वय ३१, रा. हरियाणा) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल उत्तम चौधरी (वय ४०, रा. पुनावळे), संजीव नारायण पवार (रा. चिखली), ओमकार संजय कटागळे (रा. कोंढावळे), संजय नारायण पवार (रा. चिंचवड), परमोर लक्ष्मण पवार (रा. आंबी, मावळ) आणि तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल चौधरी याने इतर आरोपींसोबत संगनमत करून विविध बँकांचे व फायनान्स कंपनीचे फोर क्लोजर सर्टिफिकेट, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि फॉर्म ३५ तयार केले. त्यावर खोट्या सह्या करून बँकेचे व फायनान्स कंपनीचे बनावट शिक्के मारले. त्याचा आरटीओ कार्यालय पिंपरी-चिंचवड व पुणे येथे वापर करून स्पिनी कंपनीला एकूण बारा चारचाकी गाड्यावर विविध फायनान्स कंपनीचे व बँकांचे लोन नसल्याचे भासवले. त्या गाड्या कंपनीला विकल्या. त्या मोबदल्यात कंपनीकडून आरोपींनी ९६ लाख ३१ हजार रुपये घेत कंपनीची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.