पार्सलच्या पिशवीवरून लावला खुनाचा छडा; गुंडाविरोधी पथकाने दोन आरोपींना वाशिममधून घेतले ताब्यात
वारंवार होणाऱ्या वादामुळे दोन जणांनी मिळून मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना औंध रुग्णालयाच्या आवारात मंगळवारी (दि. ८) उघडकीस आली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने पार्सलच्या पिशवीवरून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला.
पप्पु उर्फ जितेंद्र त्रिपाठी (रा. अहोदा, तहसील राजापूर, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिव मंगल सिंग (वय ३८) आणि सोमदत्त मनमोहन दुबे (वय २२, दोघेही रा. अहोदा, तहसील राजापूर, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे औंध रुग्णालय परिसरात एकाचा दगडाने ठेचून खून झाल्याचे उघडकीस आले. मयत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख साहाय्यक निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोन व्यक्ती मृत व्यक्तीसोबत दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून सांगवी परिसरात दारू घेण्यासाठी आल्याचे दिसून आले. त्यातील एकाच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाची पार्सलची पिशवी होती. संशयित दुचाकीवरून कोठे जात आहे हे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता तो कृष्णा चौकातील कुरियरच्या कंपनीमध्ये गेल्याचे निष्पन्न झाले. कुरिअर कंपनीमध्ये जाऊन चौकशी केली असता आरोपीचे नाव समोर आले.
आरोपीचा मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी पारनेर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर रवाना केले. तांत्रिक तपासातून आरोपी जेवणाकरिता अर्धा तास थांबले असल्याचा संशय आला. त्यानुसार, पोलिसांनी परिसरातील एका हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी जेवण करण्यासाठी एक तासापूर्वी थांबल्याचे निष्पन्न झाले. त्या फुटेजवरून आरोपी प्रवास करीत असलेल्या ट्रॅव्हल बस क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना समृध्दी महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील शेल टोल प्लाझा येथून ताब्यात घेतले. साहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक अशोक जगताप, कर्मचारी पी.पी.तापकीर, एस.एन.ठोकळ, व्ही.एच.जगदाळे, जी.डी.चव्हाण, एस.डी.चौधरी, ए.पी.गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
ट्रॅव्हल्स मालकाला तंबी
तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी ट्रॅव्हल्स मालकाला फोन केला. तुमच्या बसमध्ये आरोपी असून पोलीस पाठलाग करीत असल्याचे सांगितले. त्यासाठी बसचा वेग कमी ठेवण्याची तंबी त्यांना दिली. त्यानुसार, बसचालकाने बसचा वेग कमी ठेवल्याने पोलिसांनी वाशिम येथे आरोपी प्रवास करीत असलेल्या बसला गाठत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.