पिंपरी-चिंचवड: सहा वर्षांत २७६ पोलिसांवर हल्ले; प्राणघातक हल्ल्यांचे प्रमाण वाढले

पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या सहा वर्षांत तब्बल २७६ पोलिसांवर हल्ले झाले आहेत. कारवाई करताना झालेली धक्काबुक्की ते थेट वाहनाने उडवून केलेला प्राणघातक हल्ला असे या हल्ल्यांचे स्वरूप आहे.

सहा वर्षांत २७६ पोलिसांवर हल्ले; प्राणघातक हल्ल्यांचे प्रमाण वाढले

कारवाईदरम्यान झालेली धक्काबुक्की ते प्राणघातक हल्ला असे हल्ल्यांचे स्वरूप

पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या सहा वर्षांत तब्बल २७६ पोलिसांवर हल्ले झाले आहेत. कारवाई करताना झालेली धक्काबुक्की ते थेट वाहनाने उडवून केलेला प्राणघातक हल्ला असे या हल्ल्यांचे स्वरूप आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र आयुक्‍तालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर गुन्हेगारी आटोक्‍यात येईल, असे सर्वसामान्य नागरिकांना वाटले होते. त्यानुसार, नामचीन गुंडांचा उपद्रव कमी झाला. मात्र, गल्लीबोळातील भुरट्यांनी पोलिसांची डोकेदुखी कायम ठेवली. मागील तीन महिन्यात एकूण पाच पोलिसांवर हल्ले झाले आहेत. वाहनचालक एवढे सरावले आहेत की ते पोलिसांनाच वर्दी उतरवायची भाषा करू लागले आहेत. कारवाईला गेलेल्या पोलिसांवर अरेरावी करणे, त्यांना धक्काबुक्की करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. वाहतूक नियमन करताना पोलिसांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांवर दंड आकारल्यानंतर ते थेट पोलिसांशी हुज्जत घालतात. यातून अनेकदा भांडणे होऊन वाहतूक पोलिसांवर हल्ले झाले आहेत.

नुकतेच वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला कारवाई करताना काळ्या काचा असलेल्या भरधाव कारने उडवले. यामध्ये गंभीर जखमी झालेला पोलीस अंमलदार मागील तीन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस तसेच वाहतूक शाखेतील पोलिसांवरही हे हल्ले झालेले आहेत. त्यामुळे आता आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आयुक्तालयात अपुरे मनुष्यबळ...

वाहतूक पोलिसांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रत्येक चौकात एकापेक्षा जास्त पोलीस अधिकारी अंमलदार तैनात असणे आवश्यक आहे. मात्र, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे प्रत्येक चौकात पोलिसांची स्वतंत्र टीम नेमताना मर्यादा येत आहेत. चौकात पोलीस एकटा असल्याचे पाहून काही गुंड प्रवृत्तीचे चालक पोलिसांवर हल्ला करण्यास धजावत आहेत.

संपूर्ण गणवेशाची वानवा...

पूर्वी रस्त्यावरून पोलीस निघाले की, गुंडांना पळता भुई थोडी होती. हातात काठी, डोक्‍यावर टोपी व अंगातील खाकी वर्दीमुळे एक वेगळाच दबदबा होता. आता तो दबदबा कमी होताना दिसत आहे. अनेक पोलीस टोपी वापरत नाहीत. तसेच हातातील काठी गायब झाली आहे. आंदोलन, बंदोबस्त किंवा कुठे अनुचित प्रकार घडला तरच हातात काठी दिसते.

वाढत्या खाबुगिरीचा राग ?

पोलिसांच्या खाबुगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा मालिन होत आहे. पोलीस चिरीमिरी घेतानाचे व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे जनमानसात पोलिसांबाबत चीड निर्माण होत आहे. याचाच फटका रस्त्यावर उभे राहून नियमन करणाऱ्या पोलिसांना बसताना दिसत आहे. दरम्यान, पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचे म्हटल्यास पोलिसांना नोकरी समोर दिसते. आपल्या हातून विपरीत घडले तर निलंबित होण्याची भीती असते. त्यामुळे अनेकदा पोलिसांनाच अन्याय सहन करावा लागतो.

वर्ष

पोलिसांवर झालेले हल्ले
२०१८ ४०
२०१९ ३३
२०२० ४१
२०२१ ७९
२०२२ ५१
२०२३ २८
२०२४ (मार्च अखेर) ०५

सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजचे आहे. वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्याशी विनाकारण हुज्जत घालू नये. यापुढे पोलिसांवर हल्ला केल्यास कोणतीही गय केली जाणार नाही.

— विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest