पुणे: पोर्शे अपघातप्रकरणी ९०० पानांचे आरोपपत्र

पुणे : कल्याणीनगरमधील पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुमारे ९०० पानांचे आरोपपत्र गुरुवारी (दि. २५) विशेष न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रामध्ये ५० पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Sat, 27 Jul 2024
  • 02:07 pm
Pune Porsche Accident Case, Pune Crime News,  Charge Sheet

संग्रहित छायाचित्र

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल, ५० पेक्षा अधिक साक्षीदारांचे नोंदवले जबाब

पुणे : कल्याणीनगरमधील पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुमारे ९०० पानांचे आरोपपत्र गुरुवारी (दि. २५) विशेष न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रामध्ये ५० पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत.

यापूर्वी बाल न्याय मंडळाला अल्पवयीन आरोपीबाबतचा साधारण १५० पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर, सविस्तर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आगामी काही दिवसांत कलम १७३ (८) प्रमाणे आणखी विस्तृत आणि सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव पोर्शे कारची धडक बसल्यामुळे दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर भादंवि ३०४, ३०४ (अ), २७९, ३३८, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५, १९९/१७७ अन्वये दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामधील पुराव्यांमध्ये छेडछाड झाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात भादंवि २०१, १२० ब, २१३, २१४, ४६७ या कलमांची वाढ करण्यात आली.

 पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचा वडील असलेला पुण्यातील बडा बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, ससूनचा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांच्या प्रकरणात भ्रष्टाचार अधिनियम  १९८८ चे कलम ७, ७(अ), १३ मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५,११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल हिलादेखील अटक करण्यात आली होती.

आरोपी मुलाच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्या जागी शिवानी अगरवालचे नमुने घेण्यात आले होते. तसेच, अश्पाक बाशा मकानदार (वय ३६, रा. धानोरी), अमर संतोष गायकवाड (वय २७, रा. सुभाष नगर, नवी खडकी, येरवडा) या दोघांना ससूनच्या डॉक्टरांना पैसे दिल्याच्या आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. अशाप्रकारे या गुन्ह्यात एकूण सात आरोपींवर कारवाई झालेली आहे.

या प्रकरणात मूळ साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज, त्याचे तांत्रिक विश्लेषण, घटनास्थळाचा पंचनामा, फॉरेन्सिक लॅबचे अहवाल, क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल, तांत्रिक पुरावे आदींचा यामध्ये समावेश आहे. यासोबतच आरोपींचे जबाब, त्यांच्याकडे करण्यात आलेला तपास, प्रत्यक्षदर्शी आणि घटनास्थळावरील वस्तुस्थितीजन्य पुरावे, त्यांचे तांत्रिक विश्लेषण याच्या अहवालांचा समावेश या आरोपपत्रात करण्यात आलेला असल्याचे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितले.

डीएनए चाचणी, सीसीटीव्ही डीव्हीआर अहवाल बाकी

दरम्यान, याविषयी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे म्हणाले की, पोर्शे अपघात प्रकरणाचा गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात प्राथमिक आरोपपत्र गुरुवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आले आहे. अद्याप काही अहवाल येणे बाकी आहेत. डीएनए चाचणीचा अहवाल, फॉरेन्सिक लॅबकडे सीसीटीव्ही डीव्हीआर पाठविण्यात आले आहेत, त्याचा अहवाल येणे बाकी आहे. अशा प्रकारचे अहवाल, तपासात होणारी प्रगती असे सविस्तर आरोपपत्र येत्या काही दिवसांत न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त बलकवडे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest