प्रवाशाच्या कानाचा तोडला लचका, पोलीसांनी रिक्षा चालकाला केली अटक
रिक्षाच्या भाड्याच्या कारणावरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाने चक्क प्रवाशाच्या कानाचा लचका तोडला होता. तसेच प्रवाशावर कोयत्याने वार करून चालक पळून गेल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार पुण्यातील स्वारगेट परिसरात १ जून रोजी घडला होता. या प्रकरणी पसार झालेल्या रिक्षा चालकाला स्वारगेट पोलीसांनी अटक केली आहे.
आदेश संजय काळे (वय ३९, रा. पर्वती दर्शन, पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवाशी हे त्यांच्या मुळगावी अलिबाग येथे जात होते. यासाठी ते स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे रिक्षाने आले होते. मात्र, यावेळी रिक्षा चालक आदेश काळेसोबत त्यांचे भाडयाच्या कारणावरुन वाद झाला. त्यानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी प्रवाशाला मारहाण केली. त्यांच्यावर कोयत्याने वार केला. पण तो प्रवाशाने हुकविल्याने ते खाली पडले. खाली पडल्याने रिक्षा चालकाने फिर्यादी यांच्या कानाचा चावा घेवुन कानाचा लचका तोडला. त्यानंतर रिक्षा चालक पळून गेला.
याबाबत प्रवाश्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तपास करत असताना रिक्षा चालक बारामती येथे असल्याचे माहिती पोलीसांना मिळाली. याबाबत अधिक खात्री केली असताना रिक्षा चालक स्वारगेट येथे येणार असल्याचे पोलीसांना समजले. त्यानुसार, पोलीसांना सापळा रचून रात्री १० च्या सुमारास स्वारगेट बस स्टँड परिसरातून रिक्षा चालकाना अटक केली. चौकशी तो गुन्हेगार असून त्याच्यावर ०३ खुनाचे आणि इतर ०४ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. सध्या त्याच्यावर कलम ३०७, ३२५, ३४ क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.