संग्रहित छायाचित्र
येरवडा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी (दि. २८) दुपारी सव्वातीनच्या सुमारास न्यायाधिन चार कैद्यांनी एका कैद्यावर कात्री व दरवाजाच्या बिजागिरीने हल्ला केला. यामध्ये कैद्यांनी पूर्ववैमनस्यातून त्याच्या मानेवर व पोटात वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कैद्याला सुरुवातीला कारागृहातील रुग्णालयात त्यानंतर ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना कैद्याचा मृत्यू झाला. महेश महादेव चंदनशिवे असे या मृत्यू झालेल्या न्यायाधिन कैद्याचे नाव आहे.
येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक दोन व बराक क्रमांक एक मध्ये न्यायाधिन कैदी अनिकेत समदूर, महेश माने, आदित्य मुठे व गणेश मोटे व चंदनशिवे यांना ठेवले होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास चारही कैद्यांनी चंदनशिवे याच्यावर हल्ला केला. कात्री व दरवाजाच्या बिजागिरीने त्यांनी चंदनशिवे याच्या मानेवर व पोटावर सपासप वार केले. त्यामुळे बराकमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. तुरुंग रक्षक व अधिकारी यांनी चंदनशिवे याला बाजूला केले.
मात्र तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला सुरुवातीला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कारागृहाच्या रुग्णवाहिकेतून ससूनला दाखल केले. चंदनशिवे याचा ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. चारही कैद्यांना पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याचे येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.