संग्रहित छायाचित्र
पुणे: विद्येचे माहेरघर, आयटी सिटी, सामाजिक चळवळींचे केंद्र अशी एक ना अनेक बिरुदे मिरवणाऱ्या पुणे शहराला एकीकडे ऑटोमोबाईल हब म्हणून नवी ओळख मिळवून देण्यात येणार असल्याचे शासनस्तरावर सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे पुण्यातील गुन्हेगारीचा टक्का दिवसागणिक वाढत चालला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच, पोलीस आयुक्तांनी सर्व बेकायदेशीर धंदे बंद करण्याचे आदेश देऊनही राजरोसपणे अनेक ठिकाणी हे धंदे सुरू आहेत. हे धंदे स्थानिक पोलिसांच्या आणि गुन्हे शाखेच्या काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादावर पोसले जात असल्याचा आजवरचा इतिहास आहे. काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व वसूलदारांच्या बदल्या केल्या. मात्र, जुन्यांची जागा नव्या ‘वसूलदारां’नी घेतली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवून कारवाई केली जात असली तरी या कर्मचाऱ्यांना हे ‘काम’ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई केली जात नाही.
शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा धंदे बोकाळले होते. कुठे मटका तर कुठे जुगार... कुठे हातभट्टी तर कुठे सोरट... कुठे ऑनलाईन लॉटरीचा जुगार तर कुठे बेटिंग... असे अनेक धंदे जोमात होते. शहरात ड्रग्जचा सुळसुळाट झाला होता. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात हजारो कोटींचे ड्रग्ज एकदा नव्हे तर दोनदा पकडले गेले. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब-बारमुळे तर सुरक्षेचा आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या धिंगाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याविषयी कारवाई करताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या वसूलदारांची यादी तयार केली. साधारणपणे ७० पेक्षा अधिक लोकांची यादी तयार करण्यात आली.
ही यादी तयार केली जात असताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या ‘जवळच्या’ कर्मचाऱ्यांची नावे यामध्ये येणार नाहीत, याची मात्र व्यवस्थित खबरदारी घेतली. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आजही यातील काही जण ‘सक्रीय’ असल्याचे सांगितले जाते. ज्या कर्मचाऱ्यांवर वसुलीचा ठपका ठेवण्यात आला होता, त्यांच्या बदल्या विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या. कारवाईच्या धास्तीने हे कर्मचारी सध्या शांत बसले आहेत. आपल्याला नेमून दिलेले काम करण्याचा अनेकांचा प्रयत्नदेखील आहे. आमचा दोष नसतानाही केवळ चुकीची माहिती दिली गेल्याने कारवाई झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
पोलीस आयुक्तांनी यादीमधील सर्वांना सुरुवातीला उजळणी कोर्स करण्याची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर, या सर्वांना वारीच्या बंदोबस्तालादेखील पाठवण्यात आले होते. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी शहरातील जुगार, मटका अड्डे, बेकायदा धंदे तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी ‘तोडपाणी’ करू नये, असे त्यांनी वारंवार बजावले होते. मात्र, तरीदेखील पोलीस ठाण्यांचे अनेक अधिकारी तसेच काही वरिष्ठ अधिकारी हा आदेश मानण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. शहराच्या विविध भागात छुप्या पद्धतीने बेकायदा धंदे सुरू आहेत. पुण्यातील जवळपास सर्वच परिमंडळांमध्ये हे धंदे हळूहळू वाढताना दिसत आहेत.
‘वसूलदारां’ची क्षेत्रे
जुने वसूलदार गेले आणि त्यांच्या जागी नवे नेमले गेले. अधिकाऱ्यांनी नवीन वसूलदार नेमताना त्यांचे वर्गीकरणदेखील केले आहे. बेकायदा धंद्यांना आश्रय देणे, हॉटेल, भंगार दुकाने, बार आदींमधून काहीजण वसुली करीत आहेत. जमिनीचे आणि मालमत्तांचे व्यवहार ‘सेटल’ करून देणे अशी कामेदेखील काही महाभाग करतात. शहराच्या विविध भागात मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे शहरात सध्या दिवाळीचा उत्साह आहे. सर्वजण दिवाळीच्या तयारीत गुंतलेले आहेत, तर काही कर्मचारी केवळ फटाका विक्रेत्यांच्या मोहिमेवर निघालेले असल्याची चर्चा आहे. या कर्मचाऱ्यांना ही कामे ठरवून आणि नेमून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, असा सवाल पोलीस कर्मचारी ‘दबक्या’ स्वरात करू लागले आहेत.