Nagpur Railway Station Attacked : नागपूर हादरले ! मनोरुग्णाने रेल्वे स्थानकात प्रवाशांवर केला हल्ला; दोन प्रवाशांचा मृत्यू
नागपूर : रेल्वे स्थानकावर खळबळजनक घटना घडली असून, एका मनोरुग्णाने तब्बल १२ प्रवाशांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मृतांपैकी एकाचा ओळख पटली असून त्याचे नाव गणेश कुमार डी. (वय ५४, दिंडीगुल, तामिळनाडू) आहे, तर दुसऱ्या प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही. लोहमार्ग पोलिसांनी आरोपी जयराम रामअवतार केवट या उत्तर प्रदेशच्या रहिवाशाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर घडली. काही प्रवासी ट्रेनची वाट पाहत होते, तर काही प्रवासी आणि भिक्षुक झोपले होते. त्याचवेळी एक मनोरुग्ण तिथे आला. तो इतर प्रवाशांसारखाच वागत असल्याने त्याच्याबद्दल कोणालाही शंका आली नाही. काही वेळ तिथे फिरल्यानंतर अचानक त्याने लाकडी काठीनं १२ लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन प्रवासी ठार झाले, तर दोन जखमी झाले आहेत.
आरोपी जयराम रामअवतार केवट हा उत्तर प्रदेशातील सितापूर जिल्ह्यातील हैदरपूर गावचा रहिवासी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो स्टेशनवर काही प्रवाशांशी वाद घालताना दिसत आहे, त्यानंतर तो अचानक हिंसक झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून तो स्टेशनवर का आणि कसा आला, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी हल्ल्यातील जखमी प्रवाशांकडून आरोपीबद्दल माहिती मिळवली. त्यानुसार, आरोपीने पांढरा शर्ट घातला होता आणि त्याला दाढी होती. या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. आरोपी अत्यंत हिंसक असल्याने त्याच्याकडून आणखी हल्ला होण्याची भीती होती. पोलिसांनी आरोपीला फलाट क्रमांक ७ जवळ सापळा रचून अटक केली. पुढिल तपास पोलीस करत आहेत.