संग्रहित छायाचित्र
पुणे : महावितरणचे कर्मचारी असल्याची बतावणी करीत कमी वीजबिलाचे आमिष दाखवून ग्राहकाची आर्थिक फसवणूक व महावितरणचे वीजमीटर परस्पर बदलल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील मार्केट यार्डजवळ ढोबीमळा येथे अंबिका चंदर चव्हाण यांच्यानावे महावितरणने वीजजोडणी दिली आहे. तथापि मीटर रीडिंगच्या पर्यवेक्षणात ग्राहक क्रमांक व महावितरणकडून लावण्यात आलेला मीटर क्रमांक जुळत नसल्याचे संगणकीय प्रणालीत दिसून आले. त्यानंतर मंचर शाखेचे सहायक अभियंता संजय बारहाते व सहकाऱ्यांनी वीजग्राहक चव्हाण यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली. यामध्ये महावितरणकडून लावण्यात आलेल्या वीजमीटरऐवजी दुसऱ्याच कंपनीचा वीजमीटर लावलेला आढळून आला. यासंदर्भात वीजवापरकर्ते चंदर धरम चव्हाण यांच्याकडे विचारणा करण्यात आली. यात ‘गणेश महादेव इंदोरे (रा. चांडोली, ता. आंबेगाव) व प्रवीण पाचपुते (जारकरवाडी, ता. आंबेगाव) या दोघांनी दोन महिन्यांपूर्वी घरी येऊन महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगितले. वीजबिल दरमहा कमी येईल असे आमिष दाखवून वीजमीटर बदलण्यासाठी ७ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर जुना वीजमीटर घेऊन गेले व दुसरा मीटर बसविला’, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
तथापि गणेश इंदोरे व प्रवीण पाचपुते दोघेही तोतया कर्मचारी असल्याचे लगेचच स्पष्ट झाले. या दोघांनी कर्मचारी असल्याची बतावणी करून चव्हाण यांच्याकडील अधिकृत वीजमीटरची विल्हेवाट लावली व त्याठिकाणी दुसरे मीटर बसवले. महावितरणसह वीजग्राहकाची फसवणूक केल्याचे आढळून आले. त्यानुसार मंचर पोलीस ठाण्यात महावितरणकडून तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांनी या दोघांविरुद्ध कलम १७०, ४२०, ४२७, १३६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तोतया कर्मचाऱ्यांपासून सावधान : मुख्य अभियंता राजेंद्र पवार
मीटरमधील वीज वापर कमी दाखवणे, मीटरची गती संथ करण्यासाठी मीटरमध्ये फेरफार करणे, परस्पर वीजमीटर बदलणे किंवा वीजबिलाची रक्कम कमी करून देण्याचे आमिष दाखविणे आदींसाठी कोणत्याही व्यक्तीने वीजग्राहकांकडे आर्थिक मागणी केल्यास त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. याबाबत महावितरणच्या संबंधित कार्यालयामध्ये तात्काळ कळवावे किंवा तक्रार करावी असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.