Pune Crime News : पुण्यात 'उडता पंजाब'! ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापडलं कोट्यावधीचं एमडी

पुणे शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून तब्बल १ किलो ७५ ग्रॅम वजनाचे सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले. पुणे शहर पोलीसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 1 Oct 2023
  • 03:44 pm
Pune Crime News

ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापडलं कोट्यावधीचं एमडी

पुणे : पुणे शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून तब्बल १ किलो ७५ ग्रॅम वजनाचे सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले. पुणे शहर पोलीसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. अमली पदार्थ विक्रीचं हे एक हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी कुख्यात ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट सक्रीय आहे. वाढत्या गुन्हेगारीसोबतच शहरात अमली पदार्थ सेवनाचे प्रकार सर्रास सुरु आहेत. यावर आळा घालण्यासाठी पोलीसांकडून प्रयत्न सुरु आहे. अशातच पुणे पोलीसांना ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर मोठा अमली पदार्थाचा साठा मिळाला आहे. यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. ललित पटेलला वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी ललित पटेल याच्यासह ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये कंत्राटी पध्दतीवर काम करणार्‍या एकाला ताब्यात घेतले आहे. तिसरा आरोपी हा रुग्णालयात अ‍ॅडमिट असून त्याला याप्रकरणी नोटीस देखील देण्यात आली आहे. न्यायालयीन प्रकियेनंतर त्याला या गु्न्ह्यात अटक करण्यात येणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. 

विद्येचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराला ड्रग्सचा विळखा पडलाय. यामागचं कारण आहे पुण्यात खुलेआम सुरू असलेली ड्रग्जची विक्री. त्यामुळे पुण्याची वाटचाल उडता पंजाबच्या दिशेने होतोय की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान पुण्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात झिंगाट होताना पाहायला मिळत आहे. पुणे पोलिसांनी यावर आता कारवाई करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest