संग्रहित छायाचित्र
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम विभागाचे सभापती मंगलदास बांदल यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली असून पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील तब्बल ८५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ‘ईडी’ने याबाबतची माहिती दिली आहे. बांदल यांना ईडीने २१ ऑगस्ट रोजी बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लाॅंड्रिंग) प्रकरणी अटक केली होती. त्यांच्या शिक्रापूर बुरुंजवाडी, तसेच महंमदवाडी येथील निवासस्थानांवर त्यावेळी ईडीच्या पथकांनी एकाच वेळी छापे टाकून कागदपत्रे जप्त केली होती. यापूर्वी बांदल यांच्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने कारवाई केली होती. बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यांच्या घरझडतीमध्ये ५ कोटी ६० लाखांची रोकड, पाच आलिशान गाड्या तसेच १ कोटींची ४ घड्याळे आढळून आली होती.
मनी लाॅंड्रिंग प्रकरणात त्यांना ईडीने एक वर्षभरापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. बांदल यांची शिरूर आणि पुण्यात निवासस्थाने आहेत. बांदल यापूर्वी आत्तापर्यंत ईडीसमोर चारवेळा हजर झाले होते. त्यानंतर, पहिल्यांदाच २१ ऑगस्ट रोजी छापा टाकण्यात आला. अत्यंत गोपनीय पद्धतीने ईडीने ही कारवाई केली होती. त्यावेळी त्यांची पत्नी आणि दोन भावांची चौकशी करण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी प्राप्तिकर विभागाने बांदल यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये मोठी रक्कम आणि महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. बांदल यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल असून त्यांना अटकही झालेली होती. या प्रकरणात ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान बांदल यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर वंचितने त्यांची उमेदवारी रद्द केली होती. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी बांदल किंवा त्यांच्या पत्नी रेखा या शिरूर-हवेलीमधून निवडणुकीची तयारी करीत असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर बांदल यांच्यावर 'ईडी'ची छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात त्याची चांगली चर्चा रंगली होती. त्यानंतर, आता ईडीने अटक केली आहे.
५० कोटी खंडणीचे प्रकरण
बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. या सराफी व्यावसायिकाच्या पत्नीच्या अश्लील व्हीडीओ प्रकरणी त्यांनी ५० कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणात अनेकांना अटक देखील झाली होती.
वादग्रस्त पार्श्वभूमी
राजकारणी असले तरी विविध गुन्हे दाखल असल्याने बांदल नेहमीच वादात राहिले आहेत. पुणे जिल्हा बँकेच्या कथित फसवणूक प्रकरणात दोन वर्ष तुरुंगात व्यतीत केली होती. फसवणूक, खंडणीसह विविध गुन्हे दाखल असल्याने त्यांची ‘इमेज’ नकारात्मक झालेली आहे.