Pune Crime News : ‘ॲमॅझॉन’चे काम देण्याचे आमिष, प्राध्यापकाला घातला 20 लाखाचा गंडा

एफके मॉल कंपनीमधून बोलत असल्याची बतावणी करीत ॲमॅझॉन कंपनीला प्रॉडक्ट एक्सपोजर हवे असल्याचे सांगत शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर प्लेस करण्याच्या बदल्यात कमिशन देण्याचे आमिष दाखवून एका प्राध्यापकाची २० लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 3 Oct 2023
  • 10:41 am
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

प्रॉडक्ट एक्सपोजर हवे असल्याचे सांगत २० लाख ५९ हजारांची फसवणूक, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लक्ष्मण मोरे

एफके मॉल कंपनीमधून बोलत असल्याची बतावणी करीत ॲमॅझॉन कंपनीला प्रॉडक्ट एक्सपोजर हवे असल्याचे सांगत शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर प्लेस करण्याच्या बदल्यात कमिशन देण्याचे आमिष दाखवून एका प्राध्यापकाची २० लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

हा प्रकार ऑगस्ट २०२१ ते ५ डिसेंबर २०२२ या कालावधीदरम्यान ऑनलाईन घडला. या प्रकरणी सतचिदानंद रामदासजी सातपुते (वय ४२, रा. बरसाणा धाम, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा रंजन, राशीद, आदित्य, बजाज अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. त्यांचे केवळ मोबाईल क्रमांक पोलिसांकडे असून पूर्ण नाव, पत्ते अद्याप निष्पन्न झालेले नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपुते हे बिबवेवाडी येथील व्हीआयटी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करतात. ते कुटुंबासह राहण्यास आहेत. त्यांना ऑगस्ट २०२१ मध्ये मोबाईलवर एसएमएस आला होता. त्यामध्ये, ॲमॅझॉन कंपनीमध्ये पार्टटाईम जॉब असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी समोरून बोलणाऱ्या महिलेने तिचे नाव रेखा रंजन असल्याचे सांगितले.  ‘‘आमची एफके मॉल नावाची फर्म असून ही फर्म ॲमेझॉन कंपनीसोबत प्राॅडक्ट सेल्सचे काम करते. ॲमेझॉन कंपनीला प्राॅडक्ट एक्सपोजर हवे असल्याने त्यांच्या शॉपिंग प्लॅटफॉर्म वरून ऑर्डर प्लेस करायची आणि त्या बदल्यात ॲमेझॉन कंपनी भरघोस कमिशन देणार आहे,’’ अशी बतावणी तिने केली.

सातपुते यांना पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी या कामाला होकार दिला. आरोपींनी त्यांना वेबसाईटची एक लिंक व्हॉटसॲपवर पाठवली. या लिंकवर जाऊन त्यांनी एक अकाउंट तयार केले. या अकाउंटमध्ये त्यांना एक हजार रुपयांचे  रिचार्ज करण्यास सांगितले गेले. रेखा हिने पाठविलेल्या यूपीआय आयडीवर 'गुगल पे' द्वारे त्यांनी एक हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी वेबसाईटवर जाऊन ऑर्डर प्लेस केली. त्यानंतर सातपुते यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यामध्ये १३०० रुपये जमा झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांना टेलिग्रामची लिंक पाठविली. आरोपी राजू याने स्वत:चे नाव सांगत इथून पुढे तो त्यांना गाईड करणार असल्याचे सांगितले. राजू याने त्यांना दोन हजार रुपये आणि पाच हजार रुपयांच्या ऑर्डर प्लेस करण्यास सांगितले.

हा टास्क पूर्ण केल्यानंतर सातपुते यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार आणि साडेसहा हजार रुपये जमा झाले. त्यांना वेळोवेळी विविध टास्क देण्यात आले. टास्कमधील ऑर्डर प्लेस करण्यासाठी सातपुते यांनी त्यांच्या बँक खात्यामधून वेळोवेळी पैसे पाठविले. वेळोवेळी देण्यात आलेले टास्क त्यांनी पूर्ण केले. त्यांनी तयार केलेल्या एफके मॉलच्या अकाउंटमध्ये ६ लाख ७५ हजार रुपये  बॅलन्स दिसत होता. हे पैसे आपल्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी सातपुते यांनी  प्रोसेस केली. परंतु, पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. त्यांनी टेलिग्राम अकाउंटवर संपर्क केला. त्यावेळी, ‘‘दिलेले टास्क वेळेत पूर्ण न केल्याने तुमचे  अकाउंट डॅमेज झाले आहे. त्यासाठी अकाउंट रिपेअर करावे लागेल,’’ असे सातपुते यांना सांगण्यात आले. त्यानुसार सातपुते यांनी एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँकेतील खात्यामधून आरोपींनी दिलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यावर सुरुवातीला ३ लाख ३ हजार २०० रुपये, त्यानंतर १३ लाख ११ हजार ३११ रुपये आणि नंतर ४ लाख ४५ हजार ३१२ रुपये पाठवले.

 सातपुते यांनी एकूण २० लाख ५९ हजार ८२३ रुपयांची रक्कम अकाऊंट रिपेअरसाठी पाठविली. या कालावधीदरम्यान, रेखा रंजन, राशीद, आदित्य, बजाज या फोन करणाऱ्या व्यक्तींकडे त्यांची रक्कम बँक खात्यामध्ये कधी जमा होईल, याची विचारणादेखील ते करीत होते. तसेच त्यांनी दिलेल्या ईमेल आयडीवरदेखील वारंवार विचारणा करीत होते. परंतु, आरोपी प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून आणखी पैशांची मागणी करत होते. त्यामुळे त्यांना संशय आला. सातपुते यांनी त्यांचे सर्व पैसे परत मागितले. परंतु, त्यांनी आजपर्यंत पैसे परत दिलेले नाहीत. आरोपी अद्यापही त्यांना पैसे भरण्यासाठी फोन करत आहेत.  ऑगस्ट २०२१ पासून ते आजपर्यंत रेखा रंजन आरोपींनी त्यांना ते एफके मॉल कंपनीमधून बोलत असल्याचे सांगत ॲमॅझॉन कंपनीला प्राॅडक्ट एक्सपोजर हवे असल्याची बतावणी केली.  शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर प्लेस करण्याच्या बदल्यात भरघोस कमिशन देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये २० लाख ५९ हजार ८२३ रुपयांची रक्कम भरायला लावली. त्यांना कोणतेही कमिशन न देता तसेच भरलेली रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

ॲमॅझॉन कंपनीचे काम देण्याच्या आमिषाने प्राध्यापकाची २० लाख ५९ हजारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. हा सर्व गुन्हा ऑनलाइन पद्धतीने घडला आहे. आरोपींचे मोबाईल क्रमांक उपलब्ध झाले असून त्यावरून त्यांचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- हरीष शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक, कोंढवा स्टेशन

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest