कल्याणीनगरमधील दुर्घटनेप्रकरणी हलगर्जी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत येरवडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
कल्याणीनगरमधील (Kalyani Nagar) भीषण अपघातप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचे त्वरित निलंबन करावे, पब, हॅाटेलच्या वेळा कमी कराव्या आदी मागण्यांसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
कल्याणीनगर येथे रविवारी पहाटे एका मद्यधुंद स्पोर्ट पोर्शे कारच्या धडकेत संगणक अभियंता तरुण व तरुणीचा मृत्यू झाला. त्याचे पडसाद दिवसभर सोशल मीडियावर उमटत होते. या दुर्घटनेची दखल घेत काँग्रेसने येरवडा पोलीस ठाण्यात संध्याकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi), माजी नगरसेवक सुनील मलके, शिवाजी क्षीरसागर, माजी नगरसेविका अश्विनी लांडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी कारवाईचे निवेदन पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांना दिले. यावेळी उपस्थितांनी पोलीस प्रशासनाच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रविवारी पहाटे कल्याणीनगर येथे शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत भरधाव कार चालवत दोघांना चिरडले. या घटनेच्या निमित्ताने शहरातील पब आणि बारच्या व्यवहाराकडे आमदार धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले.
शहरातील पब आणि बारवर कारवाई करण्याची वेळोवेळी मागणी करूनही पुणे पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे धंगेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेल, पब आणि बारमुळे असे गंभीर प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. तसेच अपघाताच्या घटनांबाबतही वारंवार नागरिकांनी तक्रारी केल्या. अशा बाबी पोलिसांच्या निदर्शनास आणूनही त्यावर कारवाई केली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.कल्याणीनगर येथील भीषण अपघाताची दुर्दैवी घटना ही यातूनच घडलेली आहे. ही हाय प्रोफाईल केस माध्यमांनी उचलून धरल्यामुळे, त्याकडे लक्ष वेधले गेले. पुणे शहराची संस्कृती टिकून राहावी यासाठी हॉटेल, पब, बार यांच्या वेळांमध्ये बदल करावा. गंभीर बाब म्हणजे अल्पवयीन मुलाच्या हातात महागडी कार दिल्यामुळे दारूच्या नशेत हा भीषण अपघात घडला. त्यामध्ये निष्पाप दोघांना जीव गमवावा लागला. पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद असून यामध्ये संबंधित सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत. तसेच हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबाव टाकणाऱ्या व्यक्ती कोण आहेत याचीदेखील सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच पालकमंत्र्यांकडे आमदार धंगेकर यांनी निवेदनात केली आहे.