Kalyani Nagar Accident: दोघांचे जीव घेणारा अल्पवयीन आरोपी १४ दिवस सुधारगृहात राहणार; पुणेकरांच्या दबावानंतर अखेर जामीन नामंजूर!

जागरूक पुणेकरांनी उठवलेली टीकेची झोड तसेच माध्यमांच्या दबावामुळे येरवडा येथील बाल न्याय मंडळाने हिट ॲण्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन बुधवारी (दि. २२) नामंजूर करून त्याला १४ दिवस सुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला.

Kalyani Nagar Accident

संग्रहित छायाचित्र

जागरूक पुणेकरांनी उठवलेली टीकेची झोड तसेच माध्यमांच्या दबावामुळे येरवडा येथील बाल न्याय मंडळाने हिट ॲण्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन बुधवारी (दि. २२) नामंजूर करून त्याला १४ दिवस सुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला.

या १४ दिवसांत अल्पवयीन मुलाला मानसोपचार तज्ज्ञांकडून सुमपदेशन मिळणार आहे. गुरूवारी (दि. २३) या मुलाच्या पालकांशी बोलून उच्च न्यायालयात अपील करण्या संदर्भात विचारविनियम करणार असल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

कल्याणीनगर येथे रविवारी (दि. १९) पहाटे अडीचच्या सुमारास अल्पवयीन मुलाकडून पोलिशान पोर्शे स्पोर्ट्स कारच्या धडकेत दोन संगणक अभियत्यांचा मृत्यू झाला होता. या मुलाने मद्यमान करून बेदरकारपणे भरधाव वेगाने कार चालविल्यामुळे हा अपघात झाला होता. त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, रविवारी बाल न्याय मंडळाचे एक सदस्यीय न्यायदंडाधिकारी डॉ. एन. एल. धनवडे यांनी अवघ्या १२ तासांत या मुलाचा जामीन मंजूर केला होता. यावेळी वाहतूक पोलिसांबरोबर चौकात थांबून वाहतूकीचे नियमन करणे तसेच अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहण्यासह सात अगदी शुल्लक अटींसह हा जामीन देण्यात आला होता. (Kalyani Nagar Accident)

या बाल न्याय मंडळाच्या एक सदस्यीय न्याय दंडाधिकाऱ्याच्या दिलेल्या न्यायाबद्दल माध्यमांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्याचबोबर पुणेकरांसह देशभरातील जागरूक नागरिकांनी समाजमाध्यमांवरून टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे राज्याचे गृहमंत्रिपद सांभाळत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. २१) पुणे शहर पोलीस आयुक्तालयात येऊन बाल न्याय मंडळाचा आदेश नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा असल्याचे सांगितले होते. यासह बाल न्याय मंडळाने आपल्या आदेशाची समीक्षा करावी, अन्यथा राज्य सरकार उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले होते.

बाल न्याय मंडळात बुधवारी मंडळाचे प्रमुख दंडाधिकारी मानसी परदेशी, डॉ. एन. एल. धनवडे आणि के. टी. थोरात या तीन सदस्यांपुढे अल्पवयीन मुलाच्या वकिलांनी आणि सरकारी वकिलांनी आपापली बाजू मांडत युक्तिवाद केला. सकाळी ११ वाजता बाल न्याय मंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली. वादी आणि प्रतिवादींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी अल्पवयीन मुलाचा जामीन नामंजूर केला. यासह पुढील १४ दिवस म्हणजेच ५ जूनपर्यंत त्याला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती ॲड. प्रशांत पाटील यांनी दिली.

आरोपीचा मुक्काम स्वतंत्र खोलीत

येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू औद्योगिक शाळेत असलेल्या निरीक्षणगृहात हिट ॲंड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ठेवण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला या सुधारगृहातील स्वतंत्र खोलीत ठेवले आहे. या ठिकाणी त्याला सुधारगृहातील नियमाप्रमाणे दैनंदिन व्यवहार करावा लागणार आहे. त्याला स्वयंपाकाला मदत करावी लागणार असून स्वत:चे कपडे धुवावे लागणार आहे. या काळात त्याला येथीलच जेवण घ्यावे लागणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest