पुण्यात गुंडांवर होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’ ‘ईट का जबाब पत्थर से…’

शहरातील गुन्हेगारांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. यापुढे ‘ईट का जवाब पत्थर से’ अशा पद्धतीने गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा सज्जड दम आयुक्तांनी दिला आहे.

Pune police

संग्रहित छायाचित्र

शहरातील सराईत गुन्हेगारांना पोलीस आयुक्तांचा निर्वाणीचा इशारा

शहरातील गुन्हेगारांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. यापुढे ‘ईट का जवाब पत्थर से’ अशा पद्धतीने गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा सज्जड दम आयुक्तांनी दिला आहे.

काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी ‘गोली का जवाब गोली से’ असा दम भरत प्रत्यक्ष कृतीद्वारे पुण्यातील गुन्हेगारांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली होती. त्यानंतर, आता अमितेश कुमार यांनीही  त्याच ‘लाईन’वर वेगळ्या पद्धतीने इशारा दिला आहे. गुन्हेगारी नेस्तनाबूत करणार असल्याचे ते म्हणाले. शहरात सलग झालेल्या खुनाच्या घटना, कोयत्यांचा वाढता वापर, गुन्हेगारीचे उदात्तीकरण याला पायाबंद घालण्याकरिता तसेच गुंडगिरीचा बीमोड करण्याकरिता आवश्यक पावले उचलली जात आहेत. गुंडांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला जाणार असून शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचा दावा आयुक्तांनी केला. (Pune police)

पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. पोलीस या प्रकरणाबाबत संवेदनशील आहेत. खून प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असलेल्यांवर कडक कारवाई केली जात आहे. हा खून कौटुंबिक वाद, संपत्ती, तसेच वैमनस्यातून कट रचून झाला असून त्याकरिता गुन्हेगारी टोळीची मदत घेण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपींनी खून करण्यापूर्वी नियोजन केले होते. खून प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १११ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी खुनाची संख्या घटलेली आहे. तुलनेने गुन्हेगारी कमी झाली आहे. ‘क्रिमिनल इंटेलिजन्स’ सतर्क करण्यात आले असून गुन्हेगारी टोळ्यांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

  मोक्कातून सुटलेले आरोपी ‘टार्गेट’

शहरातील गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मोक्का, एमपीडीएमध्ये कारागृहामधून जामिनावर बाहेर आलेले तसेच खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यातील गुंडांची यादी तयार करण्यात आली आहे. या ७५६ गुंडांची यादी पोलिसांनी हाती घेऊन त्यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. यासोबतच सोशल मीडियावर आक्षेपार्ह, दहशत माजविणारे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स, पोस्ट टाकणाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारांना पाठिंबा देणारे, त्यांना आश्रय देणारे आणि उदात्तीकरण करणाऱ्या व्हाईट कॉलर व्यक्तीही रडारवर असून त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे.


आंदेकर प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना सज्ञान ठरविणार

वनराज आंदेकर खून प्रकरणात एकूण १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अल्पवयीन असले तरी त्यांनी केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. या मुलांना सज्ञान आरोपी गृहीत धरूनच कारवाई केली जाणार आहे. त्यांना सज्ञान ठरविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. अल्पवयीनांची योग्य ती चाचणी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.

गजा मारणेच्या ‘रिल्स’वरून इशारा

कुख्यात आणि सराईत गुन्हेगार गजानन उर्फ गजा मारणे, नीलेश घायवळ यांच्या रिल्स मागील काही महिन्यात सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. पुण्याचे मालक, बॉस आदी नावांनी या रिल्स व्हायरल होत असून तरुणांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. शहरातील गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांची ‘परेड’ काढत त्यांना सज्जड दम देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मारणे, घायवळ यांच्यासह शहरातील अनेक गुन्हेगारांच्या वर्तणुकीत फरक पडणार नसेल तर , त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. लवकरच पोलिसांच्या कारवाईचे स्वरूप आणि परिणाम दिसतील असा इशारा आयुक्तांनी दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest