संग्रहित छायाचित्र
पुणे : कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी घेतलेली नसताना तसेच महाराष्ट्र काऊन्सील ऑफ इंडियन मिडिसीन यांच्याकडून मान्यता प्राप्त शैक्षणिक अर्हता न घेता दवाखाना चालविणाऱ्या तोतया डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ३१८ (४), ३१९ (२), महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट ३३, ३५, ३६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
बिभुती विमल बागची (वय ४३, रा. गोकुळनगर, वारजे) असे तोतया डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तरडे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, बागची हा परजिल्ह्यातील आहे. त्याने वारजे भागातील सय्यदनगर येथे मूळव्याध उपचार केंद्र सुरू केले होते. साधारणपणे २००२ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत त्याने हा दवाखाना याठिकाणी चालवला. त्याने एनडी, बीईएमएस (एनडी) या वैद्यकीय पदव्या घेतल्याचे भासवले. वास्तविक त्याच्याकडे महाराष्ट्र काऊन्सील ऑफ इंडियन मिडिसीन यांच्याकडून कोणतीही मान्यता प्राप्त शैक्षणिक अर्हता नव्हती.
याठिकाणी रुग्णांची दिशाभूल करीत त्याने बेकायदा उपचार केंद्र सुरु केले होते. बागची हा बेकायदा दवाखाना चालवीत असून त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि शिक्षण नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार, डॉ. तरडे यांनी पोलिसांकडे याविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली.