Pune Crime : गुंगीचे ओैषध पंजून वृद्धेला लुबाडले
पुणे : काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका वयोवृद्ध महिलेला सोबत नेऊन लिंबू सरबतामधून गुंगीचे औषध देत तिला लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोथरूड परिसरात घडली. चोरट्या महिलेने वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल असा दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोनाली नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला दांडेकर पूल परिसरात राहते. ही महिला २७ सप्टेंबर रोजी कोथरुड भागात कामानिमित्त गेल्या होत्या. त्या मिर्च मसाला हॉटेलसमोरुन चालत जात होत्या. त्यांना सोनाली नावाच्या एका महिलेने थांबविले. काम मिळवून देण्याच्या आमिषाने या वृद्ध महिलेशी ओळख करून घेतली. तिच्याशी गप्पा मारत असताना लिंबू सरबत पिण्यास दिले. या सरबतात गुंगीचे ओैषध टाकले होते. त्यामुळे या महिलेला गुंगी आली. या महिलेला आरोपीने दुचाकीवर बसवून हडपसर येथे नेले. तेथे तिचे सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल १ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरला. त्यानंतर आरोपी महिला पसार झाली.
दरम्यान, काही वेळाने जेव्हा या महिलेला शुद्ध आली, तेव्हा तिला आपण नेमके कुठे आहोत हे समजत नव्हते. तिने परिसरातील नागरिकांकडे याबाबत विचारणा केल्यानंतर ती हडपसर भागात असल्याचे समजले. याबाबत तिने कुटुंबीयांना माहिती कळवली. घरी गेल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. आरोपी सोनालीचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.