Pune Crime News : धुरातला गांजा भुर्र....? वर्षभरात पार्लरच्या हुक्क्यात 'फॉरेन्सिक'ला आढळले फक्त निकोटिन

शहरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या 'हुक्का पार्लर'मध्ये दिल्या जाणाऱ्या हुक्क्यामध्ये गांजा असल्याचे सर्वश्रृत आहे. या गांजामुळेच बहुतांश पार्लरमध्ये युवक गर्दी करत असतात, हेही जगजाहीर आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dilip Kurhade
  • Thu, 2 Nov 2023
  • 12:52 pm
Pune Crime News : धुरातला गांजा भुर्र....? वर्षभरात पार्लरच्या हुक्क्यात 'फॉरेन्सिक'ला आढळले फक्त निकोटिन

धुरातला गांजा भुर्र....? वर्षभरात पार्लरच्या हुक्क्यात 'फॉरेन्सिक'ला आढळले फक्त निकोटिन

नमुन्यांच्या रासायनिक विश्लेषणात गांजा होतो अदृश्य, एकही कारवाई नाही

शहरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या 'हुक्का पार्लर'मध्ये (Hookah) दिल्या जाणाऱ्या हुक्क्यामध्ये गांजा असल्याचे सर्वश्रृत आहे. या (Ganja) गांजामुळेच बहुतांश पार्लरमध्ये युवक (Pune Crime News) गर्दी करत असतात, हेही जगजाहीर आहे. मात्र, शहरातील पार्लरमध्ये दिल्या जाणाऱ्या हुक्क्यामध्ये गांजाचा समावेश नसून केवळ निकोटिनसह विविध फ्लेवर दिले जात असल्याचे न्याय वैद्यक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक) विभागाने आपल्या पडताळणीत सांगितले आहे. हुक्क्यामध्ये अमली पदार्थ विशेषत: गांजा आढळल्यास संबंधित हॉटेल चालकाला एक लाख रूपये दंड आणि दहा वर्षे शिक्षेची तरतूद आहे. मात्र, गेली कित्येक वर्षांत हुक्क्यामध्ये अशा प्रकारचे अमली पदार्थ आढळलेच नसल्याचा निर्वाळा ‘फॉरेन्सिक’ विभागाने दिला आहे.

शहरात कोणकोणत्या हॉटेल्समध्ये हुक्का सुरु आहे, याची माहिती गुन्हे शाखेकडे असते.  तसेच स्थानिक पोलिस ठाण्यांनाही असते. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या हॉटेल्सना वेळोवेळी तोंडी व लेखी तंबी देतात.एखाद्या हुक्कापार्लरमध्ये गांजा विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती असल्याशिवाय पोलीस प्रशासन छापा मारत नाही अथवा कारवाई करत नसते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करून एफआयआर दाखल केलेल्या सगळ्याच हॉटेलमधील नमुन्यांच्या पडताळणीत केवळ निकोटीनच कसे काय आढळतेएफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे गांजा असल्याचे न्यायवैद्यक पडताळणीत दिसून येत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

विमाननगर, येरवडा व कोरेगाव पार्क, चंदननगर यासह चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याने काही हॉटेल्समधील व हर्बलच्या नावाखाली सुरू असलेल्या हुक्का पार्लरमधील नुमने पडताळणीसाठी गृह विभागाच्या ‘फॉरेन्सिक’ मध्ये पाठवले होते. या संदर्भात तेथे चौकशी केल्यानंतर या हुक्क्यामध्ये केवळ निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील विविध ठिकाणी छापे मारून सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियमा अंतर्गत व अन्न सुरक्षा मानके अधिनियमा अंतर्गत नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाई केलेली आहे. तंबाखुजन्य उत्पादने व सिगारेट, फ्लेवरची उत्पादने जप्त केली आहेत. मात्र, ही कारवाई तात्पुरती ठरली आहे. गांजाची रोपे लावणे, ती जवळ बाळगणे गुन्हा आहे. या गुन्ह्यात एक लाख रूपये दंड व दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

व्यसनाधीन युवकांना शहरातील हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या हुक्क्यामधून गांजाची तलफ भागवता येते. व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टर, समुपदेशक व व्यसनमुक्त होऊन पूर्ववत आयुष्य जगणारे छातीठोकपणे हुक्क्यामध्ये गांजा असल्याचे सांगतात. मात्र, पोलिस हुक्का पार्लरवर कारवाई करून येथील नुमने फॉरेन्सिक विभागात पाठवतात. तेथे नुमन्यांचे रासायनिक विश्‍लेषण होते. त्याचा अहवाल पोलिसांना पाठवला जातो. दरम्यानच्या प्रवासात हुक्क्यात (गांजा हवेत उडून जाऊन) फक्त निकोटिनचा अंश शिल्लक राहतो. याचा फायदा हुक्का चालकांना मिळतो.

गेल्या काही वर्षांत कोणत्याच हॉटेल चालकांच्या हुक्क्यात गांजा आढळल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे त्यांना शिक्षा झाल्याची माहिती समोर येत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दर महिन्याला शहरातील पाच ते सहा हॉटेल्सच्या हुक्का पार्लरमधील नुमने संबंधित पोलिस ठाण्यातुन प्राप्त होतात. हुक्क्यामधील द्रावणाचे रासायनिक विश्‍लेषण केल्यानंतर त्यामध्ये निकोटिन व काही फ्लेवर आढळतात. त्याचा अहवाल पोलिस ठाण्यांना पाठवत असल्याची माहिती न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत देण्यात येते.

दर महिन्याला शहरातील हॉटेल्सच्या हुक्का पार्लरमधील नमुने संबंधित पोलिस ठाण्यातून प्राप्त होतात. हुक्क्यामधील द्रावणाचे रासायनिक विश्लेषण केल्यानंतर त्यामध्ये निकोटिन व काही फ्लेअवर आढळल्यास त्याचा अहवाल पोलिस ठाण्यांना पाठवला जातो.

-        चित्रा कामत, उपसंचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (गृह विभाग)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest