संग्रहित छायाचित्र
दिघी : बांधकाम पूर्णत्त्वाचा महापालिकेचा दाखला व महारेराने निर्देशित केलेल्या वेळेत गृहप्रकल्प पूर्णत्त्वाचा दाखला, तसेच सोसायटीच्या जागेचे अभिहस्तांतरण करून दिले नाही. चऱ्होली बुद्रुक येथील तनिश ऑर्चिड सोसायटी येथे १८ फेब्रुवारी २०२३ ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
यामुळे तनिश असोसिएटचे भागीदार राजू मोहनलाल मेहता, श्रेणिक निर्मल परमार, दिलीप शांतीला सोलंकी यांच्या विरोधात पोलिसांनी मोफा कायदा कलम ३ व १३ अन्वये गुन्हा दाखल केला. संदीप विश्वनाथ नाईकवाडे यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. ४) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तनिश असोसिएटचे भागीदारांनी तनिश ऑर्चिड सोसायटीमध्ये राहणाऱ्या सभासदांना महापालिकेचा बांधकाम प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला व महारेराने निर्देशित केलेल्या वेळेत निवासी गृहप्रकल्प पूर्णत्वाचा दाखला दिला नाही. गृहप्रकल्पाबाबत छापलेल्या ब्रोशरमध्ये देऊ केलेल्या सुविधांच्या नावाखाली वसूल केलेल्या रकमेचा हिशेब दिला नाही. तसेच सोसायटीच्या जागेचे अभिहस्तांतरण सोसायटीच्या नावे करून दिले नाही. त्यामुळे फिर्यादी संदीप नाईकवाडे यांनी तक्रार केली.