पुणे : कोंढवा येथे बांधकाम मजुराचा खून; आधी भोसकले मग खाली फेकले, रहेजा बिल्डर्सच्या साईटवरील घटना

कोंढवा एनआयबीएम अॅनेक्स येथील एका बांधकाम साईटवर सुपरवायजरचा चाकू भोसकून खून करण्यात आला. त्यानंतर, मृतदेह पाचव्या मजल्यावरून खाली फेकण्यात आला. हा मृतदेह तिसऱ्या मजल्यावरच्या डक्टमध्ये जाऊन अडकला.

Pune murder

संग्रहित छायाचित्र

पुणे : कोंढवा एनआयबीएम अॅनेक्स येथील एका बांधकाम साईटवर सुपरवायजरचा चाकू भोसकून खून करण्यात आला. त्यानंतर, मृतदेह पाचव्या मजल्यावरून खाली फेकण्यात आला. हा मृतदेह तिसऱ्या मजल्यावरच्या डक्टमध्ये जाऊन अडकला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील सोपस्कार पूर्ण केले.  (Pune Crime)

पंकज कुमार (वय अंदाजे ३५ ते ४०) असे खून झालेल्याचे नाव आहे. पंकज कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील राहणारा होता. कोंढवा येथील एनआयबीएम अॅनेक्स येथे रहेजा बिल्डर्सची एक बांधकाम साईट सुरू आहे. या साईटवर तो सुपरवायजर म्हणून काम करीत होता. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास तो काही मित्रांसोबत इमारतीच्या पाचव्या मजल्यावर दारू पित बसलेला होता. दारू पित असताना त्यांच्यामध्ये वाद झाले. त्यामधून आरोपींनी त्याला आधी चाकूने भोसकले. त्यानंतर त्याला पाचव्या मजल्यावरून खाली फेकून दिले. गंभीर जखमी झालेला पंकज कुमार तिसऱ्या मजल्यावर जाऊन पडला. डक्टच्या सज्जावर जोरात आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रात्री या साईटवर कोणीही नसल्याने हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. 

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामगार काम करीत होते. दुपारी साधारण अडीच ते तीनच्या दरम्यान कामगारांना त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, पंकज कुमार याच्यासोबत दारू प्यायला कोण गेलेले होते याचा शोध घेतला जात आहे. आरोपींबाबत अद्याप पोलिसांना ठोस माहिती मिळू शकलेली नाही. पंकज कुमारच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली असून पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest