Pune Crime News : भोंदूबाबाने २० लाख रुपयांचे ५ कोटी करतो अशी बतावणी करत गंडवले

एका भोंदू बुवाने भक्तास दोनशे लिटर पाण्याच्या टाकीत २० लाख रुपये टाकण्यास सांगून त्या खोलीतील सर्व लाइट बंद करून खोलीत काळोख केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 1 Oct 2023
  • 10:31 am

भोंदूबाबाने २० लाख रुपयांचे ५ कोटी करतो अशी बतावणी करत गंडवले

नितीन गांगर्डे

एका भोंदू बुवाने भक्तास दोनशे लिटर पाण्याच्या टाकीत २० लाख रुपये टाकण्यास सांगून त्या खोलीतील सर्व लाइट बंद करून खोलीत काळोख केला. त्यात धूप पेटवून धूर करत मंत्र म्हणत खोलीला बाहेरून कुलूप लावले. हरिद्वारला जाऊन पूजा करून येतो, तेथे पूजा केल्यास खोलीतल्या २० लाख रुपयांचे ५ कोटी होतील अशी बतावणी करत भोंदू बाबा हातचलाखीने २० लाख रुपये घेऊन पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भक्ताने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. अमृता संतोष मुशीयान असे फसवणूक झालेल्या भक्ताचे नाव आहे.

फिर्यादी अमृता संतोष मुशीयान (वय ४२ रा. पटवर्धन गड अपार्टमेंट, माती गणपती चौक, नारायण पेठ) लोकांना बँकाकडून फायनान्स करून देण्याचे आणि रिअल इस्टेटचे काम करतात. त्यांच्या व्यवसायामध्ये अंकीतकुमार पांडे भागीदारीत एकत्र व्यवसाय करतात. फिर्यादीचा मित्र अंकीतकुमार पांडे यांची व्यवहार करत असताना तनवीर शामकांत पाटील याच्यासोबत ओळख झाली होती. त्यामुळे पांडे यांनी फिर्यादी संतोष यांची तनवीर शामकांत पाटील याच्यासोबत ओळख करून दिली होती. कालांतराने त्यांची चांगली ओळख झाली. व्यवहाराच्या निमित्ताने भेटी वाढल्या. त्यावेळी तनवीर पाटील याने अंकीतकुमार पांडे आणि फिर्यादींना सांगितले की, माझ्या परिचयाचे एक गुरुजी आहेत. गुरुजींनी माझे ५ लाख रुपयांचे ७५ लाख रुपये करून दिले आहेत. त्यामुळे गुरुजींवर खूप भक्ती असल्याचे सांगितले. फिर्यादी आणि पांडे यांनीही गुरुजींना भेटण्याचे आवाहन केले. गुरुजींना भेटल्यावर त्यांच्या चमत्काराची प्रचिती येईल अशीही बतावणी तनवीर याने केली.

तनवीर याने दि ९ ऑगस्ट रोजी फिर्यादी अमृता आणि अंकित कुमार पांडे यांची कात्रज येथील भिलारवाडीतील एका फ्लॅट मध्ये भेट करून दिली. तेथे तेथे एक भोंदू स्वयंघोषित स्वामी भगव्या कपड्यात बसला होता. तनवीन पाटील याने त्या स्वामींचे नाव आनंदस्वामी असे सांगितले. फिर्यादी आणि पांडे सोबत त्या स्वामीचे बोलणे झाले. त्यावेळी स्वामीने १५ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे द्या, त्याचे मी ५ कोटी रुपये करून देतो असे सांगितले. तनवीर पाटील आणि भोंदू आनंदस्वामीवर फिर्यादीचा विश्वास बसला. झटपट आणि कष्टाशिवाय मिळत असलेल्या आयत्या पैशांच्या मोहापायी पैसे लावण्याचे फिर्यादीचे ठरवले.

मात्र या दोघांकडे पैसे नसल्याने फिर्यादीने १ सप्टेंबर२०२३ रोजी आनंद राठी ग्लोबल फायनान्सचे मॅनेजर राजपालसिंग बलवंतसिंग जुनेजा यांच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केली.जुनेजा यांनी १२ सप्टेंबर पर्यंत पैश्यांची सोय करतो असे सांगीतले. यावर फिर्यादीने तातडीने तनवीर पाटील याला १३ तारखे पर्यंत पैशांची सोय होत असल्याचे सांगितले. त्यावर तनवीरने १३ सप्टेंबरला गुरुजींना घरी घेऊन येतो तेथेच ते पैसे वाढवण्याची प्रक्रिया करतील असे फिर्यादीला सांगीतले.

ठरल्याप्रमाणे १३ सप्टेंबरला संध्याकाळी ६ वाजता राजपाल जुनेजा आणि अंकीतकुमार पांडे हे २०लाख रुपये घेऊन फिर्यादी अमृताच्या नारायण पेठ येथील घरीगेले. त्यांनी २० लाख रुपये मोजुन पाहीले. त्यात ५०० रुपयांच्या प्रत्येकी १०० नोटांचे ४० बंडल असे एकुण २० लाख रुपये होते. त्यानंतर रात्री ९वाजता तनवीर पाटील व त्याच्यासोबत आणखी दोन व्यक्ती आले. तनवीरने त्यांची नांवे शिवम गुरुजी व सुनिल राठोड असे सांगुन त्यांची ओळख करुन दिली. फ्लॅटचे बेडरुममध्ये असे सहा जण बसले.  

शिवम गुरुजी याने एक २०० लिटरचे बॅरल (पाण्याची टाकी) समोर ठेवले. त्यात २० लाख रुपये टाकण्यास सांगितले. फिर्यादीने अंधविश्वास ठेऊन मोहापायी सर्व पैसे त्या बॅरलमध्ये टाकले. शिवम याने रुमची लाइट बंद करुन रुममध्ये धूर केला. फिर्यादींना रुमचे बाहेर काढल्यानंतर १० मिनिटाने ते तिघे बाहेर येऊन रुमला लॉक लावले. त्यानंतर तनवीर पाटील, शिवम गुरुजी, सुनिल राठोड यांनी राजपाल जुनेजा, अंकीतकुमार पांडे आणि फिर्यादी अमृता यांना सांगितले की, हरिव्दार येथे जाऊन पूजा करतो. तेथे पूजा केल्यावर २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये होतील. त्यासाठी १२ दिवसांचा अवधी लागेल. असे सांगून निघून गेले.

दिनांक २५/०९/२०२३ रोजी १२ दिवस पुर्ण झाल्यामुळेफिर्यादीने संध्याकाळी ७ वाजे पर्यत तनवीर पाटील याला फोन करून रूम उघडण्यास स्वामीजी कधी येणार आहेत असे विचारले. मात्र तनवीर पाटील याने प्रत्येक कॉलच्या वेळी उडवा उडवीची उत्तरे दिली. फिर्यादींना संशय आला म्हणून त्यांनी रूम उघडली बॅरल मध्ये पाहिले असता, त्यात पैसे नसल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

कोट- विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोज बरुरे यांनी सीवीक मिररशी बोलताना सांगितले की, या याप्रकरणी तनवीर पाटील, शिवम गुरुजी, सुनिल राठोड, आणि आनंदस्वामी यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपीना तात्काळ अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल. शिवम गुरुजी उर्फ योगेश बाळासो जाधव (रा.कोल्हपूर) आणि सुनिल राठोड (रा.पुणे मूळ हैद्राबाद) या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ३ ऑकटोम्बर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest