पुणे : ‘रियल इस्टेट’ व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; मागील आठवड्यात झाला होता धारदार हत्याराने हल्ला; जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्सजवळ पुन्हा घडली घटना

जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकावर त्याच्याच कार्यालयाच्या खाली गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर बंदुकीमधून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल लॉक झाल्याने गोळी झाडली गेली नाही.

Pune Firing

संग्रहित छायाचित्र

जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्सजवळ पुन्हा घडली घटना

पुणे : जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकावर त्याच्याच कार्यालयाच्या खाली गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर बंदुकीमधून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल लॉक झाल्याने गोळी झाडली गेली नाही. त्यानंतर, हे दोन्ही आरोपी जंगली महाराज रस्त्यावरून पसार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाऊस जवळ घडली. (pune firing)

 धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८, रा. कोहिनूर इस्टेट, मुळा रोड, वाकडेवाडी, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरगडे हे त्यांचे वडील, पत्नी यांच्यासह राहण्यास आहेत. त्यांचा डी. एस. अरगडे प्रमोटर्स अँड बिल्डर्स ना नावाने बांधकाम आणि रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांचे कार्यालय जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न शाळेसमोर अरगडे हाईट्स या इमारतीत आहे. त्यांचे वडील आणि फिर्यादी हा व्यवसाय सांभाळतात. फिर्यादीनुसार, १० मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचा मित्र उत्कर्ष दगडे यांना भेटण्यासाठी सुस येथील स्काय स्टोरीज हॉटेलमध्ये गेले होते. त्याला भेटून ते रात्री साडेदहाच्या सुमारास घरी जाण्यासाठी परत निघाले होते. त्यावेळी हॉटेलच्या पाठीमागील बाजूस पार्किंगमध्ये पार्क केलेली गाडी काढण्यासाठी फिर्यादी गेले. त्याठिकाणी उत्कर्ष याची वाट पाहत ते फोनवर बोलत उभे होते. त्यावेळी अचानक त्यांच्या पाठीमागूण एक मोटारसायकल आली. त्यांच्यापासून काही अंतरावर ही मोटार सायकल थांबली. त्यावर दोघेजण बसलेले होते.

 पाठीमागे बसलेला एक तरुण खाली उतरुन त्यांच्या जवळ आला. त्याने शिवीगाळ करून हातातील लोखंडी हत्यार फिर्यादीच्या खांद्यावर ठेवले. तेव्हा या दोघांमध्ये झटापट झाली. आरोपीने हेलोखंडी हत्यार फिरवित त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगट, उजव्या हाताचा खांदा डाव्या हाताच्या पंजावर घाव बसला. फिर्यादीने तात्काळ आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर हे दोघेही तेथून पसार झाले. त्यानंतर उत्कर्ष व आसपासच्या लोकांनी त्यांना पाषाण येथील लोपमुद्रा हॉस्पीटलमध्ये दाखल केले. उपचार पूर्ण झाल्यानंतर फिर्यादी घरी आले. त्यानंतर पोलिसांकडे याबाबत १५ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली.

दरम्यान, फिर्यादी हे नेहमीप्रमाणे कार्यालयात जाऊन कामकाज करीत होते. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते त्यांच्या अरगडे हाऊस इमारतीच्या खाली येऊन गाडीमध्ये बसले होते. त्यावेळी, दुचाकीवरुन हेल्मेट घातलेल्या दोन व्यक्ती दुचाकीवरुन आल्या. त्यांनी अंगामध्ये ‘स्वीगी’ या डिलीव्हरी एपसारखे दिसणारे ‘टीशर्ट’ घातलेले होते. हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ जाऊन दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी झाडली गेली नाही. अरगडे यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपी शिवाजीनगर गावठाणाच्या दिशेने पळून गेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींनी पळून जात असताना ‘तू आता वाचला रे’ असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

अरगडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास केला जात आहे. गोळीबार झाला आहे की नाही हे तपासले जात आहे. यासोबतच संशयित आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू असून आरोपी पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे ते म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest