'दृश्यम' स्टाईलने खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

भावाच्या खुनाचे छिन्नविच्छिन्न फोटो सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याच्या रागातून तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केला. तसेच तरुणाचा खून लपवण्यासाठी दृश्यम स्टाईलने मृतदेहाची गुजरात सीमेवर विल्हेवाट लावली.

Pimpri Chinchwad Crime

'दृश्यम' स्टाईलने खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आखला होता थंड डोक्याने प्लॅन

भावाच्या खुनाचे छिन्नविच्छिन्न फोटो सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याच्या रागातून तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केला. तसेच तरुणाचा खून लपवण्यासाठी दृश्यम स्टाईलने मृतदेहाची गुजरात सीमेवर विल्हेवाट लावली. तर त्याचा मोबाईल गोवा येथे पाठवला. खुनाचे स्टेटस बदलून 'एन्जॉयनिंग एन गोवा' असे स्टेटस ठेवत खुनाचा सगळा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर दोन दिवसांनी दुसऱ्या एकावर गोळीबार केला आणि खुनाचेही बिंग फोडण्यात चाकण (Chakan Police) अन् महाळुंगे पोलिसांना (Mahalunge Police) यश आले.

आदित्य युवराज भांगरे (Aditya Yuvraj Bhangre) (वय १८, रा. भांगरे वस्ती, महाळुंगे, ता. खेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर अजय गायकवाड (Ajay Gaikwad), अमर नामदेव शिंदे (Amar Namdeo Shinde) (वय -२५, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार (Dr. Shivaji Pawar) यांनी याबाबत माहिती दिली. तेव्हा सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर, चाकणचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ, महाळुंगे एमआयडीसीचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते आदी उपस्थित होते.

खेड तालुक्यातील रासे फाटा येथे 'मराठा' हॉटेलमध्ये हॉटेलमालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर हॉटेलमध्ये घुसून १८ मार्च रोजी काही जणांनी गोळीबार केला. त्यात स्वप्नील शिंदे जखमी झाला होता. या प्रकरणी राहुल पवार (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), अजय गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी सुरुवातीला अजय गायकवाड याला अटक केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अनोळखी आरोपीची ओळख पटवून अमर नामदेव शिंदे याला २३ मार्च रोजी अटक करण्यात आली. त्या गुन्ह्यात मुख्य आरोपी राहुल पवार हा अद्याप फरार आहे.

आरोपी राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा मागील तीन महिन्यांपूर्वी खून झाला आहे. त्या गुन्ह्यात स्वप्नील शिंदे याचा सहभाग असल्याचा संशय राहुल पवार याला होता. त्यामुळे त्याने अभिजित सदानंद मराठे (रा. कोथरूड, पुणे) आणि इतर साथीदारांसोबत मिळून स्वप्नील शिंदे याच्यावर गोळीबार केला असल्याचे अमर शिंदे याने पोलिसांना सांगितले.

राहुल पवार याने साथीदारांसोबत मिळून १८ मार्च रोजी स्वप्नील शिंदे याच्यावर गोळीबार केला. मात्र त्यापूर्वी दोन दिवस अगोदर म्हणजेच १६ मार्च रोजी आरोपींनी आदित्य युवराज भांगरे याचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचे खुनाचे छिन्नविच्छिन्न फोटो आदित्य भांगरे याने सोशल मीडियावर स्टेट्सला ठेवले होते. त्याचा राग राहुल पवार याच्या डोक्यात होता. त्यावरून राहुल पवार याने दोन साथीदारांसोबत मिळून १६ मार्च रोजी आदित्य भांगरे याचे कारमधून अपहरण केले. त्याला मारहाण करून वायरने गळा आवळून त्याचा कारमध्येच खून केला होता.

दृश्यम स्टाईलने पोलिसांची दिशाभूल

आदित्य भांगरे याचा खून करून त्याचे पुरावे आरोपींनी नष्ट केले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी खेड तालुक्यातील निमगाव येथे एका निर्जन स्थळी काहीतरी जाळले. तिथे आदित्य भांगरे याचा मृतदेह जाळला असल्याचा बनाव आरोपींनी केला. तसेच आदित्यचा मोबाईल फोन गोवा येथे एका आरोपीसोबत पाठवला. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणात आदित्य गोवा येथे असल्याचे दिसत होते. दोन्ही ठिकाणी आदित्यचा मृतदेह अथवा त्याबाबत कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. मृतदेह सापडला नाही तर त्याचा आरोपींना न्यायालयात फायदा होईल, असा विचार आरोपींनी केला होता. मात्र पोलिसांनी त्यापुढे जाऊन आरोपींनी आदित्यचे जिथून अपहरण केले तिथले सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपी ज्या मार्गाने गेले त्याचा माग काढला.

आरोपींनी आदित्य भांगरे याला गाडीतच ठार मारून त्याचा मृतदेह महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या वेलवाडा गुजरात येथे एका जंगल परिसरात जाळले होते. आदित्यच्या बेपत्ता झाल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल होती. पोलिसांनी वेलवाडा येथून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह ओळख पटविण्याच्या अवस्थेत नसल्याने त्याची डीएनए तपासणी करून ओळख पटवली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

निरीक्षक संतोष कसबे, सहायक निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, संतोष जायभाय, सहायक उपनिरीक्षक सुरेश हिंगे, पोलीस अंमलदार भैरोबा यादव, संदीप सोनवणे, राजू जाधव, हनुमंत कांबळे, निखील शेटे, नितीन गुंजाळ, सुनील भागवत, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, निखील वर्पे, महेश कोळी, माधुरी कचाटे, राजेंद्र कोणकीरी, अमोल बोराटे, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, अजय गायकवाड, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, शरद खैरे यांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest