पुणे: हॉटेल रिट्झ कार्लटनमधून एक संशयित ताब्यात ; येरवडा पोलिसांनी जप्त केली बनावट कागदपत्र

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज आणि संशयास्पद ठिकाणांची तपासणी केली जात आहे. येरवडा भागात पोलिसांकडून तपासणी सुरू होती. येथील ‘हॉटेल रिट्झ कार्लटन’मधून एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले

संग्रहित छायाचित्र

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून (Pune Police) शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज आणि संशयास्पद ठिकाणांची तपासणी केली जात आहे. येरवडा भागात पोलिसांकडून तपासणी सुरू होती. येथील ‘हॉटेल रिट्झ कार्लटन’मधून एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे विविध पत्त्यांवरील दोन आधारकार्ड, दोन मतदार ओळखपत्रे आढळून आली आहेत. यासोबतच, त्याच्याकडे विविध सिमकार्ड आणि मोबाईल फोन देखील मिळाले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास करण्यात आली. 

अब्दुल्लाह रूमी (वय ४८, रा. रीलॅक्स पीजी सर्विसेस, सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर येरवडा पोलिसांनी भादवि ४२०, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक महेश लामखडे (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. अब्दुल्लाह रूमी हा हॉटेल रिट्झ कार्लटनमध्ये उतरला होता. पोलिसांना त्याच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीस हॉटेलमध्ये तपासणीसाठी दाखल झाले. त्याच्याकडे चौकशी सुरू केल्यानंतर समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने स्वत:ची ओळख लपविण्यासाठी तसेच कोणाची तरी ठगवणूक करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारची ओळखपत्र स्वत:जवळ बाळगली होती. त्याच्याकडे विविध पत्त्यांवरची दोन वेगवेगळ्या नावांची आधारकार्ड, मतदार ओळखपत्र आढळून आली. त्याच्याकडील विविध मोबाईल कंपन्यांचे सीमकार्ड आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Pune Visit) यांच्या सोमवारी पुण्यात होत असलेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर आहेत. सर्वत्र तपासणीआणि चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. त्यापार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या संशयिताकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest