‘सुयोग डेव्हलपेंट कॉर्पोरेशन’च्या साईटवर कामगाराचा अपघाती मृत्यू

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या कृष्णराव ढोले चौकातील (सेव्हन लव्हज चौक) एका बांधकाम साईटवर कामगाराचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या कृष्णराव ढोले चौकातील (सेव्हन लव्हज चौक) एका बांधकाम साईटवर कामगाराचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी क्रेन पुरवणाऱ्या ठेकदार कंपनीसह सुपरवायजरवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चंद्रा कुबेर पात्रा (वय २०) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचे नाव आहे. याप्रकरणी ऑरेंज मशीनटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक व संचालक तसेच सुपरवायजर प्रवीण नाथा कोदर याच्यावर भादवि ३०४ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी सुरेश दासो पात्रा (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राहून कोलंबीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयोग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमार्फत कृष्णराव ढोले चौक (सेव्हन लव्हज चौक) येथे असलेल्या चंदन हॉटेल शेजारील युनिट १२, सर्वे क्रमांक ५१४/ए, ५१३/ए/बी याठिकाणी ‘सुयोग नवकार’ नावाची बांधकाम साईट सुरू आहे. या साईटवर चंद्रा कुबेर पात्रा हा काम करीत होता. 

याठिकाणी लागणाऱ्या क्रेन व तत्सम मशीनरी ऑरेंज मशीनटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पुरवलेले आहेत. या कंपनीचे मालक व संचालक तसेच सुपरवायजर प्रवीण कोदरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रा पात्रा हा काम करीत होता. टॉवर क्रेन मशीनला तांत्रिक बिघाड झाला होता. चंद्रा व अन्य तीन मजूर ही टॉवर क्रेन मशीन दुरुस्त करीत होते. त्यांनी ही मशीन खोलली होती. त्याला केबल लावण्याचे काम हे चौघे करीत होते. पार्किंगसाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हे काम सुरू होते. त्यावेळी अचानक चंद्रा याचा तोल गेला. तो पार्किंगच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या मानेला, डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, ठेकेदार व ऑरेंज मशीनटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कामगारांना कोणतेही संरक्षक साहित्य पुरविण्यात आलेले नव्हते. याठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना देखील करण्यात आलेल्या नव्हत्या. संरक्षक साहित्याची वारंवार मागणी करून देखील हे साहित्य पुरविण्यात आले नव्हते असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. कामगारांच्या जीविताकडे हयगय व अविचाराने दुर्लक्ष केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest