Anil Pawar : अखेर... नराधम गजाआड; आरपीएफचा हेड कॉन्स्टेबल अनिल पवारला बेड्या

प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात पळून आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार (Rape) प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला लोहमार्ग पोलिसांनी (Lohmarg Police) अटक केली आहे.

Anil Pawar

संग्रहित छायाचित्र

पुणे : प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात पळून आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार (Rape)  प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला लोहमार्ग पोलिसांनी (Lohmarg Police) अटक केली आहे. पुण्यातील राहत्या घरी आलेल्या आरोपीला पोलिसांनी उचलले. त्याला अटक करून न्यायालयात हजार करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याची सर्व बँक खाती गोठविली होती. तसेच, त्याच्या संपर्कात असलेल्या नातेवाईकांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावण्यात आला होता.

अनिल पवार (Anil Pawar) (रा. रेल्वे क्वॉर्टर्स, ताडीवाला रोड, प्रायव्हेट रोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणामध्ये यापूर्वी कमलेश तिवारी,  करण राठोड (३०) आणि सुष्मिता कसबे (२४) यांना अटक करण्यात आलेली होती. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून भादवि कलम ३४२, ४५०, ३८४, ३७६, ३७६ (२) (एन) ५०६, ३४ सी पोक्सो कलम ४, ६, ८, तसेच अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अनिल पवार हा 'रेल्वे प्रोटेक्शन फोर्स'मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करीत होता. त्याला यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये 'आरपीएफ'चे तत्कालीन पोलीस निरीक्षक ब्रीजभान ऊर्फ बी. एस. रघूवंशी, सहायक फौजदार पी. एम. उबाळे आणि विशेष गुप्तचर शाखेचे सहायक फौजदार साबीर शेख यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, पुणे विभागाचे सुरक्षा विभागाचे वरिष्ठ विभागीय उपअधीक्षक उदयसिंग पवार यांची आसाममधील ईशान्य फ्रंटियर रेल्वे विभागात बदली करण्यात आली होती. या सर्व प्रकरणात आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचे समोर येताच ही कारवाई करण्यात आली होती.

पवारने स्वत:च्या पत्नीच्या नावे यवतमाळ धर्मादाय आयुक्त कार्यालयात 'सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी' नावाची संस्था नोंदविलेली आहे. या संस्थेचे सदस्य म्हणून वॉचमन, फिटर, गॅरेजवाला यांना घेण्यात आलेले आहे. त्याने रेल्वेकडून रेल्वेच्या कॉलनीमधील एका इमारतीसाठी जागा संस्थेसाठी मिळवली. या इमारती समोरच असलेल्या रेल्वे कॉलनीत तो कुटुंबासह राहतो. रेल्वे स्थानकावर परराज्यामधून अथवा पर जिल्ह्यामधून पळून आलेल्या मुलांना पकडून त्यांना या इमारतीत कोंडून ठेवत त्यांच्या नातेवाईकांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. या ठिकाणी मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण केले जायचे. आरोपी तिवारी हा देखील मुलांवर लैंगिक अत्याचार करीत होता.

 पिडीत १७ वर्षीय मुलगी तिच्या प्रियकरासह छत्तीसगढवरुन १२ सप्टेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर आली होते. त्यावेळी तीन जणांनी त्यांना ताब्यात घेऊन पवारकडे नेले होते. त्यांना ताडीवाला रस्ता परिसरातील प्रायव्हेट रोड परिसरात असलेल्या रेल्वे कॉलनीतील एका पडक्या जुनाट इमारतीमधील खोलीत डांबून ठेवत पैशांची मागणी केली होती. त्यांच्याकडून पैसे उकळत पिडीत मुलीवर सलग पाच दिवस बलात्कार केला होता. मुलीचे वडील आणि छत्तीसगढ पोलीस आल्यानंतर तिची सुटका झाली होती. छत्तीसगड पोलिसांना आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर स्थानिक महिला व बाल कल्याण समितीसमोर तिने आपबीती सांगितली. त्यानंतर हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांकडे आले. या प्रकरणात पोलिसांनी कमलेश तिवारी याच्यासह सुश्मिता कसबे, करण राठोड यांना अटक केली होती. दरम्यान,  पिडीत मुलीचा सीआरपीसी १६४ नुसार, सत्र न्यायालयासमोर जबाब नोंदवत तिची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली होती.

या प्रकरणात तत्कालीन लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी गांभीर्याने हे प्रकरण हाताळले. वैयक्तिक लक्ष घालत गुन्हा दाखल करून घेत तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी सुरुवातीला संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकत महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. पोलिसांच्या हाती लागलेल्या रजिस्टरमध्ये शेकडो मुलांच्या नावांची नोंद मिळाली होती. यामध्ये अल्पवयीन मुलींची संख्या अधिक होती. अतिशय बारकाईने तपास करीत पवारच्या मालमत्तेची चौकशी करण्यास सुरुवात कटण्यात आली. 'सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी' ही संस्था, तिचे व्यवहार, कागदपत्रे तपासून पोलिसांनी खोदकाम सुरू केले होते.

दरम्यान, लोहमार्ग अधीक्षक असलेल्या धीवरे यांची धुळे येथे जिल्हा अधीक्षक म्हणून बदली झाली. पुणे लोहमार्ग अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारलेल्या तुषार दोषी यांनी देखील या प्रकरणात बारीक लक्ष घातले. विविध पथके तयार करीत अमरावती, यवतमाळ, मुंबई, कर्जत, पुसद आदी ठिकाणी ही पथके रवाना करण्यात आली. पवारची तीन विविध बँकांमधील खाती गोठविण्यात आली. त्याच्या संपर्कात असलेल्या नातेवाईकांकडे कसून तपासणीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळून लागला होता. पोलिसांच्या अटकेपासून लांब पळत असलेला पवार सर्व बाजूंनी अडचणीत आल्यानंतर गुपचूप पुण्यात आपल्या घरी परतला. ही माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

अनिल पवार आणि त्याचा साथीदार कमलेश तिवारी या दोघांवर बाललैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस दलाच्या अधिकारी दीपाली आढाव यांनी फिर्याद दिली आहे. एका १० एप्रिल २०२३ ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. पवार आणि तिवारी यांनी त्यांच्या संस्थेत दाखल करण्यात आलेल्या तीन ते चार अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांकडून हजारो रुपये घेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ३५४ (अ), ३८४, ३४२, ३४, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा ८, ९ (ओ) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest