पुणे : बोपदेव घाटात लूटमार-विनयभंग केलेल्यांकडे कसून तपास
बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस जंगजंग पछाडत आहेत. आता या आरोपींचा लवकरात लवकर शोध लागावा याकरिता पोलिसांनी यापूर्वी या घाटामध्ये लूटमार करण्याचे तसेच विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींकडे कसून चौकशी सुरू केली आहे.
गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलीस अशी तब्बल २५ पथके या प्रकरणातील आरोपींचा तपास करीत आहेत. अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे चौकशी करीत असतानाच त्यांच्याशी संबंधित आरोपींचीदेखील विचारपूस सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अद्ययावत तंत्रज्ञानासोबतच मानवी खबरे सक्रिय करण्यास सुरुवात केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या तपासात अद्याप प्रगती नसून आरोपींबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नसल्याचे स्पष्ट केले.
बुधवारी (दि. २) रात्री साधारण पावणे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली होती. मित्रासह घाटात फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या तपासात पोलिसांनी आतापर्यंत जवळपास तीन हजार मोबाईल क्रमांकांचा डंप डाटा काढला आहे. आरोपींना पकडून देणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा पोलिसांनी केली आहे. आरोपींच्या शोधासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुण्यासह सोलापूर, तसेच सातारा जिल्ह्यातील २०० संशयित तरुणांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांना उपलब्ध होत असलेल्या माहितीच्या आधारे ‘एआय’तंत्रज्ञान वापरून विश्लेषण केले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, बांबू, तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. संबंधित नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची घटनास्थळाला भेट
शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि. ८) बोपेदेव घाटातील घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली. पाच दिवस उलटूनही आतापर्यंत पोलिसांना आरोपींचा शोध का लावता आलेला नाही, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. तपासामधील अडचणींबाबत शरद पवार यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. या प्रकरणाची माहिती त्यांनी जाणून घेतली.
यावेळी सुळे म्हणाल्या, ‘‘येथील पोलीस चौकीत पोलीस नसतात. असाच अनुभव अनेक पोलीस चौक्यांमध्ये येतो. खाकी वर्दीची भीती नसल्याने गुन्हे वाढत आहेत. पोलिसांना तपसाची लिंक लागत नाही. या भागात जातायेता कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. या भागात आग्रहाने मी पोलीस चौकी मागितली होती. हा ब्लॅक स्पॉट आहे. पाच दिवस झाले आरोपी सापडत नाहीत. ही गंभीर आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. रात्री अपरात्री तिकडून अनेकजण जात असतात. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे.’’