संग्रहित छायाचित्र
पुणे : नात्यातील बहिणीसोबत असलेल्या प्रेम संबंधांमुळे चिडलेल्या भावाने या प्रियकराचा मित्रांच्या मदतीने मारहाण करीत खून केला. ही घटना सोमवारी संध्याकाळी दांडेकर पूल परिसरात घडली. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौस्तुभ जयदीप नाईक (वय २९, रा. सदाशिव पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पंकज बाळू नांगरे (वय ३१, रा. जुनी देसाई वीट भट्टीजवळ, दांडेकर पूल) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कुणाल धर्माधिकारी, चेतन भालेराव, यश काळभोर,अतिश पायाळ, गणेश थोरात (सर्व रा. जुनी देसाई वीट भट्टी, दांडेकर पूल) यांच्याविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला आहे. आरोपी धर्माधिकारी, भालेराव हे दोघे सराइत गुन्हेगार आहेत. कौस्तुभचे आणि आरोपीच्या बहिणीचे प्रेमसंबंध होते. बहिणीला पळवून नेण्याची धमकी त्याने आरोपीला दिली होती. या कारणावरुन आरोपीने कौस्तुभला सोमवारी सायंकाळी दांडेकर पूल परिसरात बोलावून घेतले.
जय महाराष्ट्र मंडळाजवळ असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुसऱ्या मजल्यावर त्याला नेण्यात आले. त्याला लाथाबु्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत टाकून आरोपी पसार झाले. त्याला रग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात एलपीजी गॅस सिलेंडर घालून खून करण्यात आला. ही घटना विश्रांतवाडीमधील धानोरी येथे सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. माधुरी मनोहर मोरे (वय ४७, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मनोहर मोरे याला अटक करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून आरोपी माधुरी यांच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात वाद आणि भांडणे होत होती. अनेकदा आरोपी मारहाण देखील करायचा. रविवारी मध्यरात्री त्यांच्यामध्ये पुन्हा भांडणे झाली. आरोपीने स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरची टाकी त्यांच्या डोक्यात मारली. वर्मी घाव बसल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.