अंगणवाडी सेविका ठरली नावडती बहीण
दिवाळीत सण उत्साहात साजरा होत आहे. आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देली जात असताना दुसरीकडे एका सहकारी अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाल्यानंतर त्याला वाचा फोडणाऱ्या अंगणवाडी सेविकांलाच पोलिसांकडून कारवाईची नोटीस आल्याने संघटनांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.
ऐन दिवाळीत अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुभाष बडे या व्यक्तीने केला. तिने त्यास प्रतिकार करताच बडे याने, अंगणवाडी सेविकेचे डोके भिंतीवर आपटले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अंगणवाडी शिक्षिकेच्या खूनप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करावी आणि सर्व अंगणवाडी शिक्षिका मदतनिसांना सुरक्षेची ओवाळणी द्यावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेने केली आहे. मात्र महिला अत्याचाराच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेण्याऐवजी या विषयाची पूर्वसूचना निवेदनाद्वासरे देणाऱ्या अंगणवाडी प्रतिनिधींना पोलिसांनी कारवाईची नोटीस बजावली आहे. यावर आता संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ता. अहिल्यानगर येथील मारुतीवाडी, गाव चिचोंडी पाटील अंगणवाडी केंद्र येथील अंगणवाडी सेविका उमा महेश पवार (वय ३२) यांच्यावर २४ ऑक्टोबर रोजी अंगणवाडी केंद्रातच सेवेवर असताना अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला विरोध करताच पवार यांचा निघृणपणे खून करण्यात आला. अंगणवाडी सेविका उमा पवार या सकाळीच अंगणवाडी केंद्रामध्ये आल्या. त्यांनी पालकांना पोषण आहार घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रात बोलावले होते. त्यावेळी सुभाष बंडू बडे या व्यक्तीने अंगणवाडी केंद्रामध्ये पवार एकट्याच असल्याचे पाहून त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केला असता, त्याने सेविकेचे डोके भिंतीवर आपटले. त्यातच सेविकेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांचा मृतदेह अंगणवाडी केंद्रातून फरपटत जवळच असलेल्या नदीच्या काठी नेला. मृतदेह नदीपात्रात फेकून आरोपी पसार झाला. अंगणवाडी केंद्राची इमारत वस्तीपासून काही अंतरावर आहे. त्यामुळे हा प्रकार लगेच कोणाच्याही लगेच लक्षात आला नाही. मात्र काही वेळाने घटनेचा उलगडा झाला.
म्हणे, कायदेशीर निर्बंधांमुळे सुरक्षेची भाऊबीज मागता येणार नाही
अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस या पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य सेवा, पूरक पोषक आहार इत्यादीद्वारे देशाच्या मानवी विकासाचे काम करतात. त्यांना अशा प्रसंगांना याआधीही सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे उमा पवार यांच्यावर गुदरलेला प्रसंग इतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येऊ नये. म्हणून भाऊबिजेच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी (दि. ४) महिला सुरक्षेची भाऊबीज मागण्यात येईल, असे निवेदन गुरुवारी (३१ ऑक्टोबर) अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने पूर्वसूचना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाणे येथे देण्यात आली. यावर कायदेशीर निर्बंधांमुळे अशाप्रकारे तुम्हाला सुरक्षेची भाऊबीज मागता येणार नाही. तुम्ही असे काही केले तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस बंडगार्डन पोलिसांनी शैलजा चौधरी, मनीषा गाडे, वैशाली गायकवाड, अनिता आवळे या अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रतिनिधींना बजावली आहे. मात्र निवडणुका येतील आणि जातील तसेच प्रतिबंधात्मक आदेश पोलीस वर्षभर लावत असतात. उमा पवार यांच्यासारखा आमचाही प्राण गेला तर आमच्या कुटुंबाकडे कोण बघणार, असा सवाल करत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविकांच्या सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी मागण्याचा निर्धार अंगणवाडी कर्मचारी सभेने व्यक्त केला आहे. अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी ही माहिती दिली.