संग्रहित छायाचित्र
पुणे : नव्याने बांधकाम झालेल्या इमारतींसाठी इलेक्ट्रिक डीपी उभारून विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मागणी केलेल्या लाचेच्या रकमेपैकी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१) असे या लाचखोर कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका विद्युत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती. सावंत हा महावितरणच्या बंडगार्डन विभागात नेमणुकीस आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासन मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार आहेत. त्यांच्या ओळखीचे काही बांधकाम व्यावसायिक आहेत. या बांधकाम व्यावसायिकांनी पाच इमारती बांधल्या आहेत. या ५ नविन इमारतींसाठी इलेक्ट्रिक डीपी उभारुन विद्युत प्रवाह सुरू करुन देण्याचे काम तक्रारदाराने घेतले होते. त्यासाठी त्यांनी ५ फाईल तयार करुन मंजुरीसाठी भाऊसाहेब सावंत यांच्याकडे दिल्या होत्या. तसेच, तक्रारदार यांनी मांजरी येथील एका नवीन इमारतीच्या ठिकाणी उभारलेल्या डीपीवर वीज भार आरोपी भाऊसाहेब सावंत याच्याकडून मंजूर करुन घेतला आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या ५ फाईल्स प्रलंबित होत्या. त्यावर कार्यवाही करण्यासाठी आणि मांजरी येथील नविन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून सावंत याने पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार देण्यात आली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. सावंत याने पाच लाखांची मागणी केली. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी त्याने दर्शविली. ही लाच स्वीकारत असतानाच त्याला एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत.