संग्रहित छायाचित्र
पुणे : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाची दोन कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इसाक बागवान (रा. सांगली), इस्माईल, दस्तगीर पटेल, जहाँगीर खान, जिशान रियाज हेबळीकर, तसेच समाज माध्यमातील ब्लॅक ऑरा वाहिनीचे चालक रवी निले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा स्वत:चा व्यवसाय आहेत. इसाक बागवान आणि त्याच्या साथीदारांनी सोशल मिडियावर ‘ब्लॅक ऑरा’ नावाने एक वाहिनी सुरू केली होती. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दीड वर्षात तीनपट परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. तसेच, गुंतवणुकीवर दररोज एक टक्का परतावा देऊ असेदेखील सांगितले होते.
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास अन्य गुंतवणूकदारांनादेखील प्रोत्साहित करण्यास भाग पाडले. अन्य गुंतवणूकदार आणल्यास आणखी पाच टक्के परतावा खात्यात जमा केला जाईल, असे सांगितले. तक्रारदाराने आरोपींकडे ४० लाख रुपये दिले होते. तसेच, त्यांनी ओळखीमधल्या अन्य लोकांनादेखील गुंतवणूक करण्यास सांगितले. तक्रारदारासह त्यांच्या मित्राने क्रिप्टो करन्सीमध्ये दोन कोटी १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मागील दोन वर्षात तक्रारदारासह अन्य गुंतवणूकदारांना आरोपींनी कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.