संग्रहित छायाचित्र
शहरातील सर्वच गॅस सिलिंडर वितरकांकडे (Gas cylinder distributors) अपुरे मनुष्यबळ, सिलिंडरची मोठी संख्या, दिवसभरात जास्तीत जास्त सिलिंडर पोचविण्याचे उद्दिष्ट त्यामुळे (Pune) सिलिंडर तोलन न करताच ग्राहकांना मिळत आहे. त्यामुळे सिलिंडरमध्ये गॅस नक्की किती वजनाचा (Cylinder Weight)आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
अनेक गॅस वितरकांनी त्यांच्या कार्यालयातील तोलन काटे कपाटात ठेवले आहेत. यापैकी कित्येकांनी गेल्या अनेक वर्षांपासून मुद्रांकन आणि तपासणीच करून घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. शहरात भारत गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीसह इंडेन कंपनीचे गॅस सिलिंडरचे वितरक आहेत. वितरक अनेक ठिकाणी होम डिलिव्हरी करतात. मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे तोलन उपकरणेच नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे सिलिंडरमध्ये अचूक वजनाचे गॅस असल्याची खात्री देता येत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. कित्येक ग्राहकांना दर डिलिव्हरी घेण्यापूर्वी गॅस सिलिंडर वजन करून घेतले जाते, याची माहितीच नाही.
वितरण कर्मचारी म्हणतात,प्रत्येक गॅस सिलिंडरचे वजन करणे कष्टाचे
वैधमापनशास्त्र विभागाच्या कायद्याप्रमाणे तोलन उपकरणांची मुद्रांकन आणि तपासणी न केल्यास त्यांच्यावर खटला दाखल होऊ शकतो. तसेच वितरकांकडे तोलन यंत्र नसल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई होऊ शकते. मात्र अनेक वितरकांनी तोलनयंत्र कपाटात ठेवले आहेत, तर काहींनी तोलनयंत्रांची मुद्रांकन आणि पडताळणी करून घेतली नसल्याचे दिसून येते. शहरातील गॅस सिलिंडरची संख्या आणि वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन पाहता प्रत्येक ग्राहकाला सिलिंडर तोलन करून देणे मोठ्या कष्टाचे काम असल्याचे गॅस सिलिंडरचे वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर स्वीकारताना त्याचे सील व्यवस्थित असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. सिलिंडर स्वीकारण्यापूर्वी कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या तोलन उपकरणांवर वजन तपासून पाहणे आवश्यक आहे. रिकाम्या सिलिंडरचे वजन आणि गॅसचे निव्वळ वजन सिलिंडरवर दर्शविण्यात आलेले असते. तसेच पावतीवर दर्शविलेले वजन पडताळून पाहता येते.
- एस. जी. महाजन, उपनियंत्रक, वैधमापनशास्त्र विभाग, पुणे
गॅस सिलिंडरचे वजन करून देणे बंधनकारक : वैधमापनशास्त्र विभागातर्फे विशेष अभियान घेऊन वितरकांकडील तोलन यंत्राची तपासणी केली जाते. सिलिंडरचे वजन करून न दिल्यास ग्राहकांनी नियंत्रण कक्ष ०२२- २२६२२०२२ आणि ०२०-२६६८३१ या दूरध्वनी क्रमाकांवर तक्रारी करण्याचे आवाहन वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.