येरवडा खुल्या कारागृहाची क्षमता होणार तिप्पट
येरवडा (Yerwada Jail)खुल्या कारागृहातील सध्याची कैदी क्षमता अडीचशे असून त्याची क्षमता आता तिप्पट होणार आहे. खुल्या कारागृहाच्या आवारातच चार इमारतींचे बांधकाम सुरू होणार असून प्रत्येक इमारतीमध्ये ५० कैद्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह स्वतंत्र किचन, डायनिंग हॉल, अंघोळीसाठी ओटे, दवाखाना आदी सुविधा असणार आहेत.
कारागृहात कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवले जाते. या ठिकाणी येण्यासाठी त्यांच्या शिक्षेची बारा वर्षे पूर्ण व्हावी लागतात. खुल्या कारागृहात शेती, विणकाम आदी कामे दिली जातात. त्या मोबदल्यात त्यांना एक दिवस काम केल्यास एक दिवस शिक्षेची सूट दिली जाते. यासह त्यांना पगारही दिला जातो. चार भिंतीच्या पलिकडचे जीवन त्यांना अनुभवायला मिळते. राज्यातील खुल्या कारागृहाची संख्या व त्यातील कैद्यांची क्षमता विचारात घेता येथे येण्यासाठी मोठी प्रतिक्षायादी असते. अनेक काटेकोर नियमांचे पालन केलेल्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवले जाते. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत खुल्या वसाहतीमध्ये राहण्याची संधी दिली जाते. त्यासाठी प्रत्येक कैद्याला खुल्या कारागृहात येण्याची तीव्र इच्छा असते.
आता येरवडा येरवडा खुल्या कारागृहाची क्षमता तिप्पट होणार असल्याने कैद्यांची प्रतिक्षा यादी संपणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा प्रमुख हेमंत पाटील म्हणाले, ‘‘ खुल्या कारागृहात चार बराक बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी एक बराक बांधून तयार झाली आहे. यामध्ये ५० कैद्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भविष्यात प्रत्येक बराकीत सिमेंट कॉंक्रिटचे बेड यासह कैद्यांसाठी स्वतंत्र किचन, डायनिंग हॉल, अंघोळीसाठी ओटे, स्वच्छतागृहे, भांडारगृह, दवाखाना, सुरक्षा खोली आदींची सुविधा असणार आहेत.
खुल्या वसाहतीची संकल्पना प्रलंबित
कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत खुल्या कारागृहांची आवश्यकता असते आधी असेल्या खुल्या कारागृहांची कैदी क्षमता वाढल्या नंतर खुल्या वसाहतीमध्ये प्रवेश मिळेल. तेथे ते कुटुंबासोबत राहू शकतील, अशी योजना असते. मात्र खुली वसाहतीची संकल्पाना प्रत्यक्षात येरवड्यात अद्याप उतरली नाही.
येरवडा खुल्या कारागृहात सध्या २५० कैदी आहेत. यात वाढ होणार असून कैदी क्षमता ७२०ने वाढवण्यात येणार आहे. कैदी शेतात विविध पिके, फळभाज्यांचे उत्पादन, विणकाम आदी कामे करतात. त्यांना कारागृह प्रशासनाच्या नियमाप्रमाणे ६५ रूपये मजूरी दिली जाते. यासह त्यांच्या शिक्षेतही सुट दिली जाते.’
- अनिल खामकर, अधिक्षक, येरवडा खुले कारागृह