पुण्यासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट
पुणे जिल्ह्यात ४ ते ६ मे वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पुण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मात्र, शहरात दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, ६ मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.