दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन
पुणे : आज जगात युद्ध, विविध समूहातील तणावाची स्थिती आढळत असून अशा परिस्थितीत माणसाला तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगता यावे यासाठी जागतिक शांतता गरजेची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
साधु वासवानी मिशन पुणे द्वारा दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण राज्य मंत्री देवुसिंह चौहान, आमदार सुनील कांबळे, इंदोरचे आमदार शंकर लालवाणी, महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्राचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किसन कुमार शर्मा, साधु वासवानी मिशनच्या अध्यक्षा श्रीमती आर. ए. वासवानी, कार्यकारी प्रमुख कृष्णा कुमारी, डॉ. वसंत आहुजा, पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाय, डाक सेवा संचालक सिमरन कौर आदी उपस्थित होते.
राज्यपाल बैस म्हणाले, व्यक्तीची आंतरिक शांती, राष्ट्रांमधील शांततापूर्ण संबंध आणि निसर्गासोबत शांततापूर्ण सहअस्तित्व या तीन पैलूंवर जागतिक शांतता आधारित आहे. आज वैयक्तिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाची स्थिती असताना आपल्याला अंतर्गत, बाह्य तसेच निसर्गासोबत शांतता गरजेची आहे. गौरवशाली इतिहास असणारा आपला भारत देश शांततापूर्ण सहअस्तित्वाचे मार्गदर्शन करू शकतो.
महाराष्ट्र ही संत आणि महापुरुषांची भूमि आहे. दादा जशन वासवानी यांच्यातही संत आणि समाज सुधारकांचा समन्वय पहायला मिळतो. ते विचारवंत, लेखक आणि तत्वचिंतक होते. त्यांचे जीवन बंधुभाव, शांती, सद्भावना, करुणा आणि शांतीपूर्ण सहअस्तित्व या मूल्यांवर आधारित होते. नैतिक मूल्य निकोप समाजासाठी आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या पैलूवर भर देण्यात आला आहे, असे राज्यपाल म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.