बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी; जुन्नर तालुक्यातील पिंपरीतील घटना

जुन्नर तालुक्यातील पिंपरी येथे बिबट्याचा सर्रास वावर असून याठिकाणी बुधवारी (दि. ९) सकाळी सहा वाजता बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुजाता रविंद्र डेरे (वय ४०) या महिलेचा मृत्यु झाला.

leopard attack

बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी; जुन्नर तालुक्यातील पिंपरीतील घटना

पिंजरा लावण्याची वनविभागाकडे मागणी

जुन्नर तालुक्यातील पिंपरी येथे बिबट्याचा सर्रास वावर असून याठिकाणी बुधवारी (दि. ९)    सकाळी सहा वाजता बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुजाता रविंद्र डेरे (वय ४०) या महिलेचा मृत्यु झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबतची माहिती अशी की,सुजाता डेरे या सकाळी सहाच्या सुमारास घराबाहेर गेल्या असता पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पती रविंद्र आले. मात्र, बिबट्याने सुजाता यांना जबड्यात धरून घरापासून १०० फुटांपर्यंत ओढून नेले होते.  बिबट्याच्या तावडीतून सुजाता यांना सोडविण्याचा  रविंद्र यांनी  प्रयत्न केला. बांबूच्या सहाय्याने ते बिबट्याचा प्रतिकार करत होते.बिबट्याने सुजाता यांना जबड्यातून सोडले व तो बाजूला असलेल्या उसाच्या शेतात निघुन गेला. सुजाता यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सुजाता यांचा जागेवर मृत्यु झाला.

या घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि इतरांनी तसेच ओतुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे घटनास्थळी पोहोचले. जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी घटनास्थळी दाखल होऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

वनविभागाने पंचनामा करून सुजाता डेरे यांचा मतदेह शवविच्छेदनासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. सुजाता डेरे यांच्या मृत्युमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. 

मेंढपाळाच्या पालात घुसून महिलेवर हल्ला
ओतूर (ता.जुन्नर) येथील वाघदरातील कुडाचे माळ परीसरात सोमवारी पहाटे बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावरील पालात घुसून महिलेवर हल्ला केला. यात ती महिला जखमी  झाली. यावेळी पालामध्ये या महिलेची दोन मुले, सून, आठ महिन्याचा नातूही होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मेंढपाळाच्या कुत्र्यानी गोंगाट केल्याने बिबट्या पळून गेला. मिराबाई बरू बरकडे (वय ४४) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. हल्यानंतर जखमी महिलेवर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी उपचार करून वनविभागाला सदर घटनेची माहीती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी महिलेला पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे नेले. सदर मेंढपाळांने ओतूरमधील वाघदरा येथील कुडाचे माळ येथे आबांदास डुंबरे यांच्या शेतात रात्रीचा मुक्कामी ठेवला होता. एकूण १५० मेंढ्या पालात ठेऊन मेंढपाळ कुटूंब झोपले होते. सोमवारी पहाटे चार वाजता बिबट्याने हल्ला केला असता कुत्र्यानी भुंकून बिबट्याला पळवून लावले. कुत्र्याच्या ओरडण्यामुळे मिराबाई यांची दोन्ही मुले अमोल, राहुल, सून, नातू सर्व जागे झाले. मुलांनी बिबट्या हल्ला केल्याची माहिती दल्यावर मिराबाईंना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest