संग्रहित छायाचित्र
कोंढवा : पुण्यामधील वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण झालेली बेशिस्त वाहतूक व्यवस्थेने अनेक बळी घेतले आहेत. कोंढव्यामध्ये अनियंत्रित वेगाने एका महिलेचा बळी घेतल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. हा गंभीर अपघात कोंढवा येथील टिळेकरनगरमध्ये घडला. या अपघातात पती जखमी झाला.
पुनितादेवी विजयकुमार सिंग (वय ४८, रा. व्यंकटेश गॅलक्सी अपार्टमेंट, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर, विजयकुमार शिवमंगल सिंग (वय ५४) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजयकुमार यांच्यावर अपघातासाठी आणि पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार बिपीन सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार आणि त्यांची पत्नी पुनितादेवी १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टिळेकरनगरमधून दुचाकीवरून निघालेले होते. विजयकुमारचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही दुचाकी घसरून पडली. त्यासोबतच हे दोघेही रस्त्यावर आदळले. डोक्याला गंभीर इजा झाली होती. पोलीस व स्थानिकांनी दोघांना ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. उपचारादरम्यान पुनितादेवी यांचा मृत्यू झाला. पुढील तपास कोंढवा पोलिसांकडून सुरू आहे.