अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे कुत्र्यांनी खाल्ले; वैकुंठ स्मशानभूमीतील भयंकर प्रकार
पुणे : पुण्यातील नवी पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही स्मशानभूमी पुणे शहरातील मध्यवर्ती भागात आहे. शहरातील ही मोठी स्मशानभूमी असून येथे मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करून देहाला अग्नि दिली जातो. मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याचा प्रकार घडल्याने मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती महापालिकेचे माजी स्वीकृत सदस्य अभिजीत बारवकर यांनी दिली.
हा प्रकार बुधवारी (दि.८) घडला. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो धक्कादायक असून व्हायरल झाले आहेत. भटकी कुत्री प्रत्यक्षात अर्धे जळालेले मानवी मृत देहाचे तुकडे खात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
वैकुंठ स्मशान भूमीत झालेल्या या प्रकारानंतर पुणेकरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी बारवकर यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. परंतु आरोग्य विभागाला आणि विद्युत विभागाला शरीराचे तुकडे नव्हे तर नारळ आणि पावसाचे तुकडे दिसत आहेत. त्यामुळे झालेल्या या प्रकारावर पडदा टाकावा, असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्मशानभूमित असा कोणताही प्रकार झालेला नाही. असे सांगून अधिकाऱ्यांनी हात वर करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे महापालिकेने निकिता बॉयलर या कंपनीला अंत्यसंस्काराचे कंत्राट दिले आहे. या निकिता बॉयलरविरोधात अभिजीत बारावकर यांनी तक्रार दिली आहे. अभिजीत बारावकर म्हणाले की, "माझा एक मित्र वैकुंठ स्मशानभूमीला त्याच्या मित्राच्या अस्थी संकलन विधीसाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की कुत्रे अर्धवट जळालेल्या मानवी मृत देहाचे तुकडे खात आहेत. कुत्र्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ते तुकडे पळवून नेले. पण त्याच दरम्यान मित्राने व्हिडीओ आणि फोटो काढले. त्यामध्ये हा प्रकार स्पष्टपणे दिसून येत आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त, सुरक्षा प्रमुख, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासह अधिकाऱ्यांना पत्र लिहून कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बारावकर म्हणाले, "अंत्यसंस्काराचे कंत्राट निकिता बॉयलरला देण्यात आले आहे. अंत्यसंस्कार पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. परंतु त्यांच्याकडून साधे लक्षही ठेवले जात नाही. कुत्र्यांना माणसाचे मांस खाण्याची सवय लागली तर ते अधिक भीतीदायक आहे. भविष्यात अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही."
बारावकर म्हणाले, "महापालिका कंत्राटदाराची बाजू घेत आहे. लोक अंत्यसंस्कारासाठी नारळ का घेऊन जातील. अंत्यसंस्कार करताना कोणी नारळ वापरताना मी पाहिलेले नाही. निकिता बॉयलरचे कामगार अंत्यसंस्काराची काळजी घेत नाहीत हे स्पष्ट आहे. अर्ध्या जळालेल्या मृतदेहांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे तुकडे खाल्ले."
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, भटक्या कुत्र्यांनी स्मशानभूमीतून अर्धे जळालेले मानवी अवशेष बाहेर काढून खाल्ले होते. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून, या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
वैकुंठ स्मशानभूमीत झालेला प्रकाराबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. भटक्या कुत्र्यांनी उचलेले तुकडे हे मानवी मृत देहाचे नाहीत. नारळ अथवा पावाचे आहेत. ज्यांनी ही तक्रार महापालिकेकडे केली आहे, त्यांच्याशी आम्ही बोललो असून असा प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विनाकारण अशी चर्चा पसरवू नये.
- मनिषा शेकटकर, मुख्य अभियंता विद्युत विभाग, पुणे महापालिका.