संग्रहित छायाचित्र
पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (गुरुवार) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र - कुलगुरू प्रा. डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य, आयआयएलचे संचालक डॉ.देविदास गोल्हार आणि अधिसभा सदस्यांसह इतर संविधानिक अधिकारी उपस्थित होते
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्ष नुकतेच पूर्ण झाले असून त्यानंतर विद्यापीठाच्या प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थी केंद्रित तसेच विद्यापीठ विभाग आणि महाविद्यालयांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यापीठ करीत असलेल्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती याप्रसंगी कुलगुरूंनी उपमुख्यमंत्र्यांना दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध कार्याचा आढावा तसेच या पुढच्या काळामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण उपमुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले.
विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे सदस्य, संविधानिक अधिकारी आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांबरोबर यावेळी विद्यापीठाच्या भविष्यकालीन योजनांविषयी अनौपचारिक चर्चा करण्यात आली. उच्च शिक्षणामध्ये होत असलेले बदल तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने घडत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आली. विद्यापीठाच्या संकुलामधील विविध सुविधांच्या अद्ययावतीकरणासंबंधात विद्यापीठाने उचललेली पावलं याची सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आणि त्या संदर्भात शासन स्तरावर जी काही मदत प्रशासनाच्या वतीने लागेल त्यासाठी निश्चितपणे महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत उभे राहील याची ग्वाही विद्यापीठास दिली
यावेळी कुलगुरू, प्र - कुलगुरू यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे, डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,डॉ. संगीता जगताप, बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य सचिन गोर्डे, संदीप कदम आणि इतर संविधानिक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यापीठाच्या विकास कामांची माहिती घेण्यासाठी गुरुवारी सकाळी भेट दिली. त्यांनी विद्यापीठातील अधिकारी व व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्याशी संवाद साधला. विद्यापीठाला पुढे घेऊन जाण्यासाठी शासन स्तरावरून मदत देण्याबाबत त्यांनी विद्यापीठाला आश्वासित केले. विद्यापीठाच्या विविध उपक्रमाबद्दल बाबत अजित पवार यांना माहिती देण्यात आली.
- प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे