संग्रहित
पुणे मेट्रोनं आपल्या कामकाजाचे तास अतिरिक्त तासाने वाढवण्याचा निर्णय घेत पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना, पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन आणि जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी ही माहिती दिली आहे.
सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मेट्रोची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत सुरु असायची. परंतु आता ही सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहणार आहे. तसेच, गाड्यांमधील मध्यांतर एक मिनिटाने कमी होईल. सात मिनिटांऐवजी आता गाड्या सहा मिनिटांच्या अंतराने धावतील.
स्वारगेट ते कात्रज पर्यंत पुणे मेट्रो लाईन 1 च्या विस्तारासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय प्रस्तावित मुक्ताई चौक ते वाकड ते नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे कामही महा-मेट्रोने सुरू केल्याचे महा-मेट्रोचे एमडी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.
माहा मेट्रोने प्रवाशांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे, जिथे ते त्यांच्या तक्रारी, सूचना आणि अभिप्राय रजिस्टर करू शकतात. प्रत्येक स्टेशनवर क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे.