वेलकम ‘बॅक’!
महेंद्र कोल्हे
पुण्याहून सांगलीला निघालेल्या एसटी बसमधील सुमारे ५० प्रवाशांना ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,’ अशा अनुभवाला सामोरे जावे लागले. जुन्या कात्रज बोगद्याजवळ एसटीचा टायर फुटूनही तसेच ब्रेक निकामी होऊनही पुण्याच्या शांती संबोळगे या युवकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे या प्रवाशांचे प्राण वाचले.
शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्रीनंतर साडेबारा ते एकच्या सुमारास ही घटना घडली. संबोळगे हेदेखील एमएच ०६ एस ८१२४ या क्रमांकाच्या पुणे-सांगली बसमधून प्रवास करीत होते. पुण्याहून सांगलीकडे निघालेली गाडी जुन्या कात्रज बोगद्याजवळ आली असताना अचानक टायर फुटला. ड्रायव्हरने गाडी थांबवून ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला असताना ब्रेक फेल झाले. यामुळे गाडी चढावरून उलट दिशेने मागे जाऊ लागली. अशा संकटाच्या क्षणी संबोळगे यांनी खिडकीतून बाहेर उडी मारली आणि इतर प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. यामुळे बसमधील सुमारे ५० प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या अपघातामुळे एसटीने प्रवास करणे नक्की सुरक्षित आहे का? सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची देखभाल व्यवस्थित केली जाते का, हे प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहेत.
या घटनेची माहिती ‘सीविक मिरर’ला सांगताना संबोळगे म्हणाले, ‘‘ही घटना घडली तेव्हा बसमध्ये सुमारे ५० प्रवासी होते. टायर फुटण्याचा मोठा आवाज झाल्यावर ड्रायव्हरने बस थांबवली. त्याने बस पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला असता अचानक ब्रेक निकामी झाले. यामुळे बस मागे जाऊ लागली. लवकर काही केले नाही तर प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते, हे लक्षात येताच मी खिडकीतून बाहेर उडी मारली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यात सहकार्य केले. शिवाय पोलिसांनाही फोन करून या घटनेची माहिती दिली.’’
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे काॅन्स्टेबल मनोहर केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर एसटी बसची अवस्था अत्यंत सुमार होती. यामुळे तिचे ब्रेक निकामी झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही वा कोणालाही दुखापत झाली नाही. बसच्या अवस्थेबद्दल माहिती असल्यामुळे टायर फुटल्यावर ड्रायव्हरने ती जुना कात्रज बोगदा सुरू होतो, त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पार्क केली. गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ब्रेक निकामी झाले. यामुळे बस मागे येऊ लागली. त्याचवेळी समोरचे टायर जाम झाल्याने बस थांबली.
या अपघाताबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘डेपोतून बस सोडण्यापूर्वी तिची तपासणी केली जाते. आमच्या ताफ्यातील काही गाड्या जुन्या झाल्या आहेत. यामुळे त्यांची जास्त देखभाल करणे आवश्यक असते. असे असले तरी, त्या चांगल्या अवस्थेत असतील आणि आरटीओकडून फिटनेस सर्टिफिकेटने प्रमाणित असतील, याची काळजी आम्ही घेतो. त्यामुळे गाड्या जुन्या असल्या तरी प्रवाशांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने त्या फिट असतात.’’ ब्रेक निकामी होण्याची घटना कोणत्याही वाहनासोबत घडू शकते. इतर साधनांच्या तुलनेत
एसटीने प्रवास करणे सुरक्षित आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.