Pune rain
पुढील ३-४ तासांत पुण्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसतील असा अंदाज हवामान खात्याच्या मुंबई विभागाने वर्तवला आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल असाही अंदाज हवामान खात्याकडून बांधण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यभरात अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी गारा देखील पडत आहेत. त्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होत असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यातच अवघ्या एक महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला असल्याने मराठवाडा, विदर्भात शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहे. मात्र, मध्येच सुरू झालेल्या अवकाळी पावसाने मशागतीची कामे देखील रखडली आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ३ ते ४ तासांत बीड, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.