नाल्यातील कचरा काही केल्या संपेना

पावसाळ्यापूर्वी नाला सफाईचे काम पूर्ण केल्यानंतर आठवडाभरातच पुन्हा तेथे कचरा साचत असल्याने महापालिकेचे अधिकारी हैराण झाले आहेत. नाला परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना नोटिसा देणे, कचरा टाकताना आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावणे अशी कारवाई करूनही पुन्हा नाला परिसरात राडारोडा पडत असल्याचे ‘सीविक मिरर’च्या पाहणीत आढळून आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Tue, 13 Jun 2023
  • 08:15 am
नाल्यातील कचरा काही केल्या संपेना!

नाल्यातील कचरा काही केल्या संपेना

ओढा-नाल्यातील कचरा स्वच्छ केल्यानंतर नागरिक, दुकानदार टाकतात पुन्हा तेथेच कचरा, दंडात्मक कारवाईही कुचकामी

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

पावसाळ्यापूर्वी नाला सफाईचे काम पूर्ण केल्यानंतर आठवडाभरातच पुन्हा तेथे कचरा साचत असल्याने महापालिकेचे अधिकारी हैराण झाले आहेत. नाला परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना नोटिसा देणे, कचरा टाकताना आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावणे अशी कारवाई करूनही पुन्हा नाला परिसरात राडारोडा पडत असल्याचे ‘सीविक मिरर’च्या पाहणीत आढळून आले आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील विकासकामांचा राडारोडा, पावसाळी गटारातील घाण आणि शहरातून जाणारे ओढे, नाले स्वच्छ करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले होते. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांची लांबी १५८ किलोमीटर आहे. कात्रजच्या डोंगरातून उगम पावणारा आंबिल ओढा शहरातील प्रमुख ओढ्यांपैकी एक आहे. हा परिसर गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. शहरात २५ सप्टेंबर २०१९ रोजी ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. त्यामुळे आंबिल ओढ्याला पूर आला. पद्मावतीमधील गुरुराज सोसायटी, सहकारनगर येथील ट्रेझर पार्क, अरण्येश्वर, टांगेवाले कॉलनी, दांडेकर पूल वसाहतीच्या परिसरात मोठी हानी झाली होती. त्याचबरोबर जांभूळवाडी तलाव ओसंडून वाहिल्याने या ओढ्यालाही पूर आला होता. या दोन्ही ओढ्यांचा बराचसा भाग सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येतो.

आंबिल ओढा आणि जांभूळवाडी तलावानंतर आंबेगावातून पुढे जाणाऱ्या ओढ्याच्या कडेला बरीच बांधकामे झाली आहेत. ओढ्यावर अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. त्यातच ओढा म्हणजे नागरिकांचे हक्काचे कचरा टाकण्याचे ठिकाण झाले आहे. वैद्यकीय कचरा, सोफा, प्लास्टिक, भाज्यांचा कचरा यांचा खच नाल्यात पडत आहे. नाले प्रवाही राहावे यासाठी नाल्यांची सफाई करण्याची कामे ड्रेनेज विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. कात्रजचा मुख्य चौक (जेएसपीएम-आयसीआयसीआय बँक), तीन हत्ती चौक धनकवडी, पद्मावती मंदिर आणि ट्रेझर पार्क येथील नाल्यांची ६ जून रोजी स्वच्छता करण्यात आली. सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रमुख सुरेखा भणगे यांनी पाहणी करत नाल्यातील कचरा उचलून नेण्याच्या सूचना केल्या. मात्र, अवघ्या सात दिवसांत या भागात पुन्हा कचरा साचू लागला आहे. चिकन दुकानदार, भाजी विक्रेते, स्थानिक नागरिक, रस्त्यावर कुल्फीचे दुकान लावणारे अशा लोकांचा कचरा या नाल्यात पडत आहे. काही नागरिक निर्माल्याच्या नावाखाली नाल्यात पिशव्या भिरकावून देतात. धनकवडीतील राऊत बागेजवळ कोणी तरी नाल्याच्या तोंडाशी खराब झालेला सोफा आणून ठेवला आहे. महापालिकेने नाल्याच्या परिसरातील नागरिकांना नोटिसा पाठवल्या आहेत. कचरा टाकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पाहणी दरम्यान नाल्यात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कचरा काढूनही पुन्हा नाल्यात कचरा जमा होत असल्याने महापालिकेचे अधिकारी हवालदिल झाले आहेत.

कात्रज येथील सामाजिक कार्यकर्ते राजू कदम म्हणाले की, कात्रज लगतच्या समाविष्ट गावातील नाल्यांची सफाई झालेली नाही. कात्रज चौक आणि इतर ठिकाणची कामे बऱ्याच प्रमाणात झाली आहेत. मात्र, काही नागरिक आणि व्यावसायिकांकडून कचरा पुन्हा-पुन्हा नाल्यात टाकला जातो. कात्रज चौकात तर रस्त्याच्या कामाचा राडारोडाही नाल्याच्या शेजारीच टाकण्यात आला आहे. पाऊस पडल्यास हा राडारोडा नक्कीच नाल्यात जाईल. त्यामुळे कात्रज चौकात पावसाचे पाणी साठून कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest