Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भोजनाची 'वाट', विद्यार्थ्यांच्या ताटात अळी...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक आठच्या भोजनगृहातील जेवणात अळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार (दि. ०७) रोजी सायंकाळी समोर आला आहे. या प्रकारानंतर वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी संबंधित भोजनगृहाचा कंत्राट रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुणे विद्यापीठातील भोजनगृहातील जेवणाच्या दर्जाबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित झाला आहे मात्र विद्यापीठ प्रशासन जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विद्यापीठीतील विद्यार्थी अनेकदा दर्जेदार जेवण मिळण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
विद्यापीठातील मुलांच्या वसतीगृह क्रमांक ८ आणि ९ या दोन्ही ठिकाणचा जेवणाचा कंत्राट एकाच कंत्राटदारा ला दिलेला आहे. वसतीगृह क्रमांक ८ मध्ये तयार करण्यात आलेले जेवण वसतीगृह क्रंमाक ९ मध्ये दिले जाते. दरम्यान काल रात्री सायंकाळी वसतीगृह क्रमांक ८ येथील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी आढळून आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मेस चालकास जाब विचारला असता काल वापरण्यात आलेले तांदूळ हे नवीन असल्यामुळे ते खबार निघाल्यामुळे जेवणात अळी आल्याचे सांगण्यात आले. असे पुन्हा होणार नाही, हे तांदूळ बदलून टाकतो, असे उत्तर मेस चालकाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आले.
विद्यापीठात कंत्राटी पद्धतीने मेस चालवली जाते. मात्र, कंत्राटदाराकडून जेवणाबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याच्या अनेकवेळा विद्यार्ध्यांच्या तक्रारी प्राप्त होतात मात्र यावर विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई केली जात नसल्याचं वारंवार समोर आलं आहे. दरम्यान या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत भोजनगृह समिती गठीत करण्याची मागणी कुलगुरू यांच्याकडे केली आहे.
बेमुदत धरणे आंदोलन सुरू..
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व इतर समविचारी संघटनांच्या वतीने विद्यार्थी प्रश्नांवर बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला वसतिगृह मिळाले पाहिजे. 2 वसतिगृह वाटप व कोटा वर्गीकरणामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या वसतिगृह प्रमुख विकास मठे यांची हकालपट्टी करण्यात यावी. 3) मुलींना धमकी देणाऱ्या ओएसडी (OSD) संगीता देशपांडे यांची हकालपट्टी करावी या प्रमुख प्रमुख मागण्या घेऊन विद्यापीठ आंदोलन करत आहेत. तसेच काल मुलांच्या मेस मध्ये जेवणाच्या ताटात अळी सापडल्याचा प्रकार घडला आहे. त्यावर भोजनगृह समिती गठीत करण्याची मागणी देखील कुलगुरू यांना करण्यात आली आहे. या आंदोलनात विद्वयापीठामधील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थी तसेच सामाजिक व राजकीय संघटनांनी सहभाग घेतला आहे. युवासेन , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस , छात्रभारती , जनता दल युनायटेड, महाज्योती विद्यार्थी संघर्ष समिती, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती , युवक काँग्रेस, युक्रांद , लोकायत, नव समाजवादी पर्याय इ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी देखील आंदोलन विद्यार्थींना भेट दिली व पाठिंबा दिला. असे नारायण चापके यांनी सांगितले.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने माननीय कुलगुरू महोदय यांची भेट घेऊन संबंधित प्रश्नांवर चर्चा झाली आहे. भोजनगृह समिती गठित करण्याची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. जर ही समिती गठीत करण्यात आली तर ती समिती या सर्व मेस वरती नियंत्रण ठेवण्याचे काम करेल व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे जेवण मिळू शकेल.
- राहुल ससाणे ( विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती )
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.