जयजवानगरमधील श्री समर्थ हॉस्पिटल हे डॉ. स्वाती पाटील यांच्या सासऱ्यांच्या मालकीचे आहे. येथे आपण प्रॅक्टीस करत नसल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
पुणे: पालिकेच्या आरोग्य विभागातील अनेक डॉक्टर नॉन प्रॅक्टीस अलाऊन्स ( एनपीए) घेऊन खासगी प्रॅक्टीस करतात. डॉक्टर पती पत्नीच्या तर पत्नी पतीच्या किंवा नातेवाईकांच्या मालकीच्या रुग्णालयात प्रॅक्टीस करीत असल्याचे ‘सीविक मिरर’ ला आढळून आले. मात्र, राजीव गांधी रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती पाटील यांचे पती अभियंता असून त्यांचे सासरे, माजी नगरसेवक दिवंगत डॉ. माणिकराव पाटील यांचा जयजवाननगर येथे दवाखाना होता. या ठिकाणी आता श्री समर्थ हॉस्पिटल सुरू आहे. येथे आपण कोणतीही प्रॅक्टीस करीत नसून उपचार घेणाऱ्या नातेवाईकांना पाहण्यासाठी गेल्याचे डॉ. स्वाती पाटील यांनी ‘ सीविक मिरर’ ला सांगितले.
डॉ. स्वाती पाटील यांच्या सासू प्रा. अलका पाटील म्हणाल्या, माझे पती डॉ. माणिकराव पाटील यांच्या मृत्यूनंतर जुन्या दवाखान्याचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले आहे. या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणण्यात आली आहे. या ठिकाणी सून डॉ. स्वाती नसून त्या प्रॅक्टीस किंवा कोणतीच रुग्ण सेवा देत नाहीत. पाटील दवाखान्यात काम करणारे डॉ. ओम पाटील यांनी ओम क्निनिक सुरू केले आहे. या क्लिनिकचा आमचा संबंध नाही. या ठिकाणी डॉ. स्वाती प्रॅक्टिस करीत नाहीत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञांसह सर्जन, प्लॅस्टिक सर्जरी करणारे वर्ग १ मधील तज्ज्ञ डॉक्टर व वर्ग -२ मधील दीडशे डॉक्टर आहेत. हे डॉक्टर कोणत्या ना कोणत्या रुग्णालयात दवाखान्यात प्रॅक्टीस करीत आहेत. मात्र, महापालिकेकडे त्यांना शोधणारी कोणतीही यंत्रणा सध्या अस्तिवात नाही. याचा गैरफायदा पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर घेत आहेत. डॉक्टरांना दरमहा दीड ते दोन लाखापेक्षा अधिक पगार आहे. यामध्ये त्यांच्या पगाराच्या ३५ टक्के अतिरिक्त रक्कम ‘नॉन प्रॅक्टीस अलाऊन्स’ ( एनपीए) म्हणून दिली जाते. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत नागरिकांनी भरलेल्या कररूपी पैशांची उधळपट्टी होत आहे.
वस्तीमध्ये २४ तास सेवा
येरवड्यातील जयजवाननगर येथे माजी नगरसेवक व दिवंगत डॉ. माणिकराव पाटील यांच्या दवाखान्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या दवाखान्याचे रूपांतर श्री समर्थ हॉस्पिटल असे करण्यात आले आहे. या ठिकाणी २४ तास रुग्णसेवा देत असून स्त्रीरोग, बालरोग अशा विविध आजारांवर उपचाराचे फलक व इतर डॉक्टरांचे नामफलक लावले आहेत. त्यामुळे लक्षावधी रुपये खर्च करून बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना पाहण्यासाठी जात असल्याचे डॉ. स्वाती पाटील यांचे वक्तव्य हस्यास्पद वाटते.
विनापरवानगी रुग्णालये
वस्त्यांमधील अनेक रुग्णालयांना महापालिकेची परवानगी नाही. असे असले तरी डोअर स्टेप सर्व्हिस देण्यासाठी वस्त्यांमध्ये २४ तास सेवा देणारी हॉस्पिटल उभी राहात आहेत. या रुग्णालयांना ना लिफ्ट आहे ना आपत्कालीन सेवेसाठी रुग्णवाहिकेचा पत्ता नाही. रुग्णालयाने बेकायदा ऑक्सिजनचे सिलेंडर बाहेर साठा करून ठेवण्यात आले आहेत. अशा अनेक रुग्णालयांचे परवाने स्थानिक क्षेत्रीय कार्यालय व उपायुक्त कार्यालयाने नाकारले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘‘ जयजवाननगर येथील पाटील दवाखान्यात किंवा श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या नातेवाईकांना पाहण्यासाठी गेले होते.’’
- डॉ. स्वाती पाटील, बालरोगतज्ज्ञ, राजीव गांधी रुग्णालय, पुणे महापालिका