विमाननगर गेले पाण्यात...! संतापलेल्या पुणेकरांनी 'ते' बॅनर लावत महापालिकेला मारला 'टोमणा'

पावसाने शुक्रवारी (दि. १) शहरात दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणी साचले होते. विमाननगरमध्ये अनेक ठिकाणी तळे तयार झाल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ‘पावसाळी लाईनचा खर्च पाण्यात आणि विमाननगरही पाण्यात’ असे बॅनर रविवारी (दि. ३) झळकावत महापालिकेविरोधात रोष व्यक्त केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Mon, 4 Sep 2023
  • 11:33 am
viman Nagar water

viman Nagar water : विमाननगर गेले पाण्यात...! संतापलेल्या पुणेकरांनी 'ते' बॅनर लावत महापालिकेला मारला 'टोमणा'

परिसराला तळ्याचे स्वरूप, ‘पावसाळी लाईनचा खर्च पाण्यात आणि विमाननगरही पाण्यात’ चे बॅनर झळकले

पावसाने शुक्रवारी (दि. १) शहरात दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणी साचले होते. विमाननगरमध्ये अनेक ठिकाणी तळे तयार झाल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ‘पावसाळी लाईनचा खर्च पाण्यात आणि विमाननगरही पाण्यात’ असे बॅनर रविवारी (दि. ३) झळकावत महापालिकेविरोधात रोष व्यक्त केला.

महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना सुखद धक्का दिला खरा... मात्र पाऊस एवढा बरसला की शहराच्या अनेक भागांत पाणी तुंबल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले. विमाननगर भागाला तर  तळ्याचे स्वरूप आले होते. महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे पाणी तुंबल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात ‘पावसाळी लाईनचा खर्च पाण्यात आणि विमाननगरही पाण्यात’अशी उपहासात्मक टिप्पणी केलले बॅनर झळकावून संताप व्यक्त केला.

‘‘विमाननगर भागातील गंगापूरम, कैलास सुपर मार्केट चौक, श्रीकृष्ण चौकासह आदी भागांमध्ये दमदार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील कठीण होऊन बसले होते. प्रत्येक वर्षी या भागात पाणी साचत असल्याचे नागरिक सांगत आहेत. याबाबत पालिकेकडे अनेक वेळा तक्रार केली आहे. ‘पावसाळी लाईनसाठी टेंडर काढण्यात आले कामदेखील केले,’ असे सांगण्यात येते. मात्र येथील पावसाळी लाईन नेहमीच चोरीला जाते की काय असे वाटू लागले आहे. कारण दरवर्षी पाऊस आला की नेमक्या याच भागात पाणी साचते,’’ असे स्थानिक नागरिक सचिन लोखंडे यांनी ‘सीविक मिरर’ ला सांगितले.

‘‘विमाननगर परिसरात मोठ्या उच्चभ्रू सोसायट्या, कर्मिशियल दुकाने, मोठे माॅल तसेच आयटी क्षेत्र असल्याने नागरिकांची वर्दळ असते. पाणी साचल्याने शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात वाहतूक कोंडीने नागरिकांचा श्वास गुदमरला. दरवर्षी अशीच परिस्थिती राहणार असेल तर मग या भागात महापालिका प्रशासन नेमके काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो,’’ असे म्हणत शैलेश मुथा यांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

ड्रेनेजच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील प्रत्यक्षात कामे न केल्यामुळे विमाननगर परिसरात चौकांमध्ये रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. दरवर्षी पाणी साचते तरी प्रशासनाला जाग येत नाही. पावसाळी लाईन टाकण्यासाठी टेंडर काढले जाते. मात्र कामे कुठे केली आहेत, हेच दिसेनासे झाले आहे. या भागातील ड्रेनेज आणि पावसाळी लाईनच्या कामाची चौकशी करावी. तसेच संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी. पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेवर संताप व्यक्त करण्यासाठी ‘नाल्यांची आणि ड्रेनेजची सफाई झालीच नाही, सफाई झाली फक्त महापालिकेच्या तिजोरीची,’ ‘विमाननगर बनले तुंबानगर,’ ‘पावसाळी लाईनचा कोट्यवधीचा खर्च पाण्यात’ असा उल्लेख असलेले फलक स्थानिक नागरिकांनी विमाननगर परिसरात लावले आहेत.

  -  चंद्रकांत जगधने, सामाजिक कार्यकर्ते

विमाननगर परिसरात मोठमोठ्या सोसायट्या आहेत. येथील नागरिकांकडून पालिकेला सर्वाधिक कर दिला जातो. मात्र त्या तुलनेत पालिका प्रशासनाकडून सुविधा पुरविल्या जात नाहीत. ड्रेनेज, पावसाळी लाईनची कामेच झालेली दिसून येत नाहीत. जी कामे झाली आहेत, ती अतिशय सुमार दर्जाची आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करण्यात आली होती. ती एका पावसात उघडी पडली. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीचाही प्रश्न वाढला आहे.  

 - रिता कांडा, स्थानिक नागरिक, विमाननगर

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest